अमजद खान, प्रतिनिधी
Ravindra Chavan Tweet Viral : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीचा धुरळा येत्या काही दिवसांत उडणार आहे. या निवडणुकीचं बिगुल वाजण्यापूर्वीच शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये कलगीतुरा रंगला आहे. दोन्ही पक्षांमध्ये नाराजीनाट्य रंगल्याचंही पाहायला मिळत आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी एकत्रित कार्यक्रम घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. दोन्ही नेत्यांमध्ये खलबतंही झाली.
परंतु, रविंद्र चव्हाण यांनी आज केलेल्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना शिंदे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या अभिजीत थरवळ यांचा प्रवेशाला स्थगिती देण्यात आली असल्याची माहिती चव्हाण यांनी ट्वीटरवर दिली आहे. चव्हाण यांच्या या पोस्टमुळे महायुतीमधील वाद संपला आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नक्की वाचा >> स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छलची सर्वात पहिली भेट कधी अन् कुठे झाली? दोघांमध्ये किती वर्ष होते प्रेमसंबंध?
शिवसेनेचे विकास देसले, अभिजीत थरवळ यांनी केला होता भाजपात प्रवेश
कल्याण डोंबिवलीत ठाकरे गटाचे दीपेश म्हात्रे यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. त्यानंतर त्याच दिवशी भाजपच्या दोन नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर शिवसेना शिंदे गटात आणि भाजपमध्ये जोरदार कुरघोडी सुरु झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी पक्ष प्रवेशाचा धडाका लावला. 24 नोव्हेंबर रोजी शिवसेना शिंदे गटाने अंबरनाथमधील भाजप महिला पदाधिकाऱ्याला पक्षात घेतले. त्यानंतर 3 डिसेंबर रोजी डोंबिवलीत शिवसेना शिंदे गटाचे विकास देसले आणि अभिजीत थरवळ यांना भाजपमध्ये प्रवेश दिला गेला.
डोंबिवलीमधील अभिजित थरवळ यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये झालेल्या पक्षप्रवेशास तूर्तास स्थगिती देण्यात येत आहे.
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) December 7, 2025
या प्रवेशावरुन दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार टिका केली. डोंबिवली सावळाराम क्रीडा संकुलात आणि सावत्रिबाई फुले नाट्य गृहाच्या नुतनीकरणाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री शिंदे आणि प्रदेशाध्यक्ष चव्हाण एकत्रित दिसले. आज थरवळ यांच्या पक्ष प्रवेशाला चव्हाण यांनी स्थगिती दिल्यानं अनेकांना धक्का बसला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world