जाहिरात
Story ProgressBack

'आम्ही मनसे का सोडली?' राज ठाकरेंच्या जुन्या सहकाऱ्यांनी सांगितली 'मन की बात'

राज ठाकरेंच्या भाषणाची शैली, त्यांनी मांडलेले मुद्दे, महाराष्ट्र धर्माची संकल्पना, टोलमुक्त महाराष्ट्र, मशिदीवरील भोंगे, दुकानं आणि आस्थापनांवरील मराठी पाट्यांसाठी आग्रही राहिलेल्या मनसेचा जोर हळूहळू कमी होत गेला.

Read Time: 5 min
'आम्ही मनसे का सोडली?' राज ठाकरेंच्या जुन्या सहकाऱ्यांनी सांगितली 'मन की बात'

मुंबई : शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर 9 मार्च 2006 या दिवशी राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली.  2007 मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचे 7 नगरसेवक निवडून आले. 2009 मध्ये पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक लढवत पहिल्याच निवडणुकीत 13 आमदार निवडून आणले, तर महापालिकेत मोठ्या प्रमाणात नगरसेवक निवडून आले होते. 2012 च्या महानगरपालिका निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दमदार कामगिरी केली. मुंबई 28, ठाणे महानगरपालिकेत 7, पुणे महानगरपालिकेत 29, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत 4, नाशिक महानगरपालिकेत 40 नगरसेवक निवडून आले होते सुरुवातीच्या काळात मनसेमध्ये उत्साह होता. राज ठाकरेंच्या भाषणाची शैली, त्यांनी मांडलेले मुद्दे, महाराष्ट्र धर्माची संकल्पना, टोलमुक्त महाराष्ट्र, मशिदीवरील भोंगे, दुकानं आणि आस्थापनांवरील मराठी पाट्यांसाठी आग्रही राहिलेल्या मनसेचा जोर हळूहळू कमी होत गेला. पक्षांतर्गत सुसूत्रतेच्या अभावाचा नेत्यांना फटका बसला. त्यामुळे सद्यपरिस्थितीत मनसेचा महाराष्ट्रात केवळ एकच आमदार शिल्लक आहे.  

पक्षाची दुरावस्था पाहता नेत्यांनी दुसऱ्या पक्षाची वाट धरली. आतापर्यंत मुंबई, नाशिक आणि पुण्यातल्या अनेक आमदार आणि नगरसेवकांनी मनसेला 'जय महाराष्ट्र' केला आहे. सद्यपरिस्थितीत मनसेतून बाहेर पडलेले अनेक नेते सत्ताधारी पक्षात आहेत, तर काहीजणं चांगल्या पदावरही आहेत. आजच्या लेखात मनसेतून बाहेर पडलेल्या नेत्यांचा घेतलेला आढावा...

भाजपचे आमदार राम कदम, मनसेचे माजी महाराष्ट्र राज्य सचिव इरफान शेख, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उपाध्यक्ष चेतन मदान, नाशिकमधील भाजपचे नेते वसंत गीते, शिवसेनेचे कन्नडमधले आमदार हर्षवर्धन जाधव, नाशिकमधील  खासदार हेमंत गोडसे, नाशिक भाजप नगरसेवक सतीश सोनवणे, औरंगाबाद भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ.सुनील शिंदे एकेकाळी मनसेत सक्रिय होते.  यापैकी काही नेत्यांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी खुलेपणाने आपली भूमिका मांडली तर काही नेत्यांनी न बोलणंच पसंत केलं. आताच वसंत मोरे मनसेतून बाहेर पडले आहेत. मोरेंआधी अनेक नेत्यांनी राज ठाकरेंची साथ सोडून पक्षाबाहेर आल्यानंतर पक्षांतर्गत हालचालींवर आपलं परखड मतं मांडली. मी एकनिष्ठ राहिलो पण माझ्या सहनशक्तीचा कडेलोट झाल्याच सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील बडे नेते वसंत मोरे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पक्षांतर्गत घडामोडींचा खुलासा केला. पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक असताना माझ्याविरोधात नकारात्मक अहवाल पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आपली भूमिका मांडताना मोरेंचा कंठ दाटून आला होता. 


वसंत मोरे:

एका मर्यादेबाहेर त्रास सहन केल्यानंतर माणूस खूप शांत होतो. त्यानंतर ना कोणाकडे तक्रार करतो, ना कोणाकडून अपेक्षा ठेवतो. मी मागची २५ वर्षे सुरुवातीच्या कालावधीत शिवसेनेत राज ठाकरेंसह काम केलं. पुणे शहरांतला मी पहिला कार्यकर्ता त्यावेळी होतो. आजपर्यंत राज ठाकरेंसह होतो. मात्र आज मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य पदाचा आणि इतर सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे. मागच्या दीड वर्षापासून मी पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे. मात्र माझ्याविरोधात कारवाया वाढल्या. इच्छुकांची यादी पक्षातली वाढली. ज्या लोकांवर पुणे शहराची जबाबदारी होती त्या लोकांनी जो अहवाल केला त्यात पुणे शहर मनसेची स्थिती नाजूक आहे अशा गोष्टी राज ठाकरेंपर्यंत पोहचवल्या. नकारात्मक अहवाल माझ्याविरोधात पाठवण्यात आला. तेव्हापासून पुण्यात मनसे लोकसभा लढवू शकत नाही असं त्यातून सांगण्यात आलं.
माझ्याविरोधात कारवाया करणाऱ्या साथीदारांबरोबर कसा काय राहू? त्यामुळे मी राज ठाकरेंकडे वेळ मागितली होती. मात्र मला त्यांच्याकडून काही निरोप आला नाही. पुण्यातल्या मनसेत असं राजकारण होणार असेल तर पुण्यात मनसेमध्ये कसा राहणार? चुकीच्या लोकांच्या हातात शहर दिलं आहे. इथला महाराष्ट्र सैनिक कुठल्या परिस्थितीतून जातो आहे ते लोकांना माहीत आहे असंही वसंत मोरे म्हणाले. मी राजीनामा दिल्यानंतर मला सगळे विचारत आहेत, पण कालच्या पोस्टचीही दखल कुणीही घेतली नाही. पक्ष वाढवण्यासाठी निवडणूक लढली गेली पाहिजे. काही लोक निवडणूक लढवायलाच नको असा अहवाल का देत आहेत? २०१२ ते २०१७ या काळात आपण सेकंड लार्जेस्ट पार्टी होतो. या शहरात मनसेची ताकद आहे. मी वारंवार सांगत होतो, तसंच वसंत मोरे खासदार होऊ शकतो हे सांगत होतो. मात्र काही लोकांना हे वाटत नाही. पक्षाच्या कोअर कमिटीने हा आरोप माझ्यावर केला आहे. मी कुठवर गोष्टी सहन करायच्या आणि गाऱ्हाणी मांडत राहायची? असं वसंत मोरे म्हणाले.

इरफान शेख :

अजूनही मला पक्षाबद्दल आस्था आहे. पक्ष सोडल्यानंतर मी कोणत्याही पक्षात गेलो नाही. त्यावेळी मशिदीवरील भोंगा हा मुद्दा त्यांनी उचलला. तेव्हा माझ्या समाजाकडून देखील प्रचंड विरोध होता. मी राज साहेबांना तसं सांगितलं होतं. मात्र त्यानंतरही त्यांनी विरोध कायम ठेवला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कोणत्याही विषयात एकसंघता दिसत नाही. धर सोड वृत्ती न करता संघटनात्मक बांधणीवर त्यांनी भर दिला तर पक्षाचे भविष्य अजूनही खूप चांगले होईल. अनेक नेत्यांना मनसेचा चांगला पर्याय मिळेल. अनेक सोडून गेलेले आमच्या सारखे कार्यकर्ते आणि नेते परत मनसेत येतील हे निश्चित.


रुपाली ठोंबरे पाटील :

लोकांच्या हक्कासाठी हातोडा घेऊन जाणारा नेता हतबल झालेला पाहून मला वाईट वाटतं आहे. कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नेत्यांच्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी कण्यासहित मोडून टाकला जातो.भाऊ तुझी  लढाई चालू ठेव ; तुझ्यासाठी बहिनीचे दरवाजे कायम उघडे आहेत हे पण लक्षात ठेव. लोकांची पसंत, मोरे वसंत ..!

चेतन मदान: 

कोणतीही निवडणूक आली की दर वेळेला मनसेची भूमिका वेगळी असते. पक्षात निष्ठेने काम करून देखील कार्यकर्त्यांना डावललं जातं. प्रत्येक कार्यकर्त्याला त्याच्या कामाची किंमत मिळाली पाहिजे. वसंत मोरे पक्षाला राम राम करणार हे सर्वांना माहीत होतं. भाजप आणि मनसेत युती होणार नाही. आधीच जागा वाटपावरून महायुतीत मारामारी सुरु आहे. सगळ्यांना जास्त जागा  हव्या आहेत. भाजप, शिंदे आणि अजित पवारांना जास्तीत जास्त जागा हव्या आहेत. मनसेसोबत गेले तर भाजपच्या जागा कमी होतील. मनसेला भाजप केवळ गाजर दाखवणार आहेत, युती करणार नाही. राज ठाकरेंना हे माहीत असल्याने ते आता भाजपच्या विरोधात बोलायला लागले आहेत. पक्षातील कार्यकर्त्याला मोठं व्हायचं असतं. मनसेचे भविष्य सध्या दिसत नाही. अशात कार्यकर्ता पर्यायी मार्ग निवडतो. दुसऱ्या पक्षात तरी त्याच्या कामाला न्याय मिळेल आणि तिकीट दिलं जाईल, अशी कार्यकर्त्यांना आशा असते. पहिल्यांदा परिस्थिती वेगळी होती. आता लोकांना वडापाव देऊन भागात नाही तर त्यांना पद हवं असतं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
डार्क मोड/लाइट मोड बदलण्यासाठी
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination