सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोटवर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आता मंत्री दिपक केसरकर यांनी पुतळा कोसळल्यानंतर नवी घोषणा केली आहे. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत छत्रपतींचा सर्वात मोठा पुतळा याच राजकोटवर उभारण्याचा निर्णय घेण्यात येईल. हा पुतळा राज्य सरकार बनवेल. तो नेव्हीच्या ताब्यात देईल. त्यानंतर याच किल्ल्यावर महाराजांचे भव्य स्मारक उभारले जाईल. त्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करू असे केसरकर यांनी म्हटले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर बोलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पुतळा कोसळल्यानंतर पालकमंत्री दिपक केसरकर यांनी राजकोटला भेट दिली. त्यांनी यावेळी घटनास्थळाची पाहाणी केली. यावेळी बोलताना त्यांनी पुतळा उभारताना काही तांत्रिक चुका झाल्याचे मान्य केले. नक्की पुतळा कशामुळे पडला याचा सर्वे केला जाईल त्यानंतर सर्व बाबी स्पष्ट होतील असे त्यांनी सांगितले. त्यावेळी नेव्ही डे होता. त्यामुळे काही गोष्टीत घाई झाली असेही त्यांना मान्य केले. मात्र याच ठिकाणी पुन्हा भव्य पुतळा उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
लोकभावना लक्षात घेता इथे नवा पुतळा उभारला जाईल. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारले जाणार आहे. पण काही अडचणींमुळे ते काम रखडले आहे. अशा वेळी तेवढेच भव्य स्मारक याच राजकोटवर उभारण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला. इथं उभारला जाणारा पुतळा हा सर्वात उंच असेल. तो राज्य सरकार बनवेल. त्यानंतर तो नेव्हीच्या स्वाधिन केला जाईल. त्यांच्या मार्फत या पुतळ्याची उभारणी या किल्ल्यावर केली जाईल असेही ते म्हणाले. याबाबत आपण मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या बरोबर बोलणार असल्याचे केसरकर म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - 'पुतळा बनवणारे ठेकेदार, शिल्पकार मुख्यमंत्र्यांच्या मर्जीतले'
राजकोटवरील पुतळा उभारताना काही प्रमाणात घाई झाल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र आता सरकारकडे पुरेसा वेळ आहे. यावेळेत एक भव्य पुतळा उभारला जाईल. त्याचे लोकार्पण ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करावे असा आपला विचार असल्याचे केसरकर म्हणाले. तसे झाल्यास तिच खरी छत्रपती शिवाजी महाराजांना खरी आदरांजली ठरेल असेही ते म्हणाले. दरम्यान हा या प्रकरणात कोणीही राजकारण करू नये असे आवाहन यावेळी केसरकर यांनी केले.
ट्रेंडिंग बातमी - सिडकोची लॉटरी, स्वप्नातल्या घराच्या किंमती कितीने वाढल्या?
दरम्यान एकीकडे केसरकर हे नवीन पुतळा उभारण्याचं बोलत असताना दुसरीकडे संजय राऊत यांनी मात्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. या पुतळ्यात लाखो कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप यावेळी राऊत यांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी ही त्यांनी केली. शिवाय सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केलीय. भ्रष्टाचारात शिवाजी महाराजांना ही या लोकांनी सोडले नाही. ज्यांचे शिवाजी महाराज लाडके होवू शकले नाहीत ते लाडक्या बहीणींचे काय होणार असा सवाल ही या निमित्ताने राऊत यांनी केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world