नांदेड : माजी मुख्यमंत्री आणि नांदेडमध्ये काँग्रेसचं वर्चस्व निर्माण करणारे अशोक चव्हाण यांनी चार दशकांच्या राजकीय प्रवासानंतर काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते नांदेडमधून लोकसभा निवडणूक लढवतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र त्यांची वर्णी राज्यसभेवर लागल्यानंतर या जागेवरुन भाजप कोणाचं नाव पुढे करणार याबद्दल चर्चा सुरू होती. भाजपने १३ मार्च रोजी लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, यात महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली. नांदेडच्या मतदारसंघातून प्रतापराव चिखलीकर यांना दुसऱ्यांदा खासदारकीचं तिकीट देण्यात आलं.
नांदेड जिल्ह्याच्या राजकारणातील गेली अनेक वर्षे अशोक चव्हाण विरूद्ध भाजपचे खासदार प्रताप चिखलीकर यांचा राजकीय संघर्ष सुरू आहे. चिखलीकर आणि चव्हाण आता एकाच पक्षात असल्यामुळे त्यांच्यातील संघर्ष संपेल, अशी शक्यता फोल ठरताना दिसत आहे. भाजपमध्ये दाखल झाल्यानंतरही अशोक चव्हाण यांचा चिखलीकर विरोध कायम असल्याचे समोर आले. नांदेड लोकसभेसाठी अशोक चव्हाण यांनी माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉ. मीनल खतगावकर यांचे नाव पुढे केले होते. संभाजीनगर येथील सभेपूर्वी मीनल यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेत उमेदवारीवर दावा सांगितल्याचे बोलले जाते. यानंतर चिखलीकरांनीही अमित शाहांची भेट घेतली होती. या भेटींनंतर नांदेडमधील राजकीय चित्र बदलेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती.
मात्र भाजप उमेदवारांची यादी समोर आल्यानंतर चर्चांना पूर्णविराम लागला. अशोक चव्हाण भाजपमध्ये आले असले तरी अंतिम निर्णय हा भाजप पक्षश्रेष्ठींचाच असेल, हे सिद्ध झालं. परिणामी अशोक चव्हानांना इथं झुकावं लागेल. त्यांनी केलेल्या शिफारसीचा इथं काहीच उपयोग झाला नसल्याचं दिसतंय. शेवटी भाजप पक्षश्रेष्ठींचा निर्णय अंतिम. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी जिल्हा आणि मराठवाड्यातील आपलं वर्चस्व टिकवून ठेवायचं आहे. नांदेडच्या राजकारणात त्यांना वाटेकरी नको असल्याने त्यांच्याकडून चिखलीकरांचा विरोध केला जात होता. त्यामुळे गेल्या लोकसभेत ज्यांच्या विरोधात लढले आता त्यांनाच जिंकून देण्याची जबाबदारी अशोक चव्हाणांवर आली आहे. नांदेडमधील सहा विधानसभेवर नजर टाकली तर त्यापैकी तीन विधानसभा काँग्रेसच्या ताब्यात आहेत. तर उरलेल्या तीन जागांवर भाजपचे आमदार आहेत. अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यानंतर हे तीन आमदार त्यांच्यासोबत भाजपमध्ये येतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अद्याप तरी कोणताही उमेदवार भाजपमध्ये आलेले नाहीत. भोकर विधानसभेत २०१९ मध्ये भोकर विधानसभेतून स्वत: अशोक चव्हाणांनी आमदारकी लढवली होती आणि 1,40,559 मतं मिळवून विजयी झाले होते. नांदेड उत्तर या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे बालाजी कल्याणकर विजयी झाले होते. सध्या ते शिंदेंच्या शिवसेनेत आहेत. नांदेड दक्षिणमध्ये गेल्या विधानसभेत काँग्रेस पक्षाचे मोहनराव हंबर्डे 46,943 मतांनी विजयी झाले होते. नायगावमध्ये 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे राजेश पवार 1,17,750 मते मिळवून विजयी झाले होते. देगलूरमधून सध्या काँग्रेसचे रावसाहेब अंतापूरकर आमदार आहेत. मुखेड या विधानसभेवर भाजपचे तुषार राठोड आमदार आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला धोबीपछाड देत त्यांनी दिल्ली गाठली. त्यानंतर त्यांच्या विजयापेक्षा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पराभवाची चर्चा राज्यभर झाली. सरपंच, तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य, आमदार, तीन वेळा जिल्हा बँकेचे संचालक, लोहा कृषी उत्पन्न बाजार समिती, लोहा नगरपरिषद या संस्थांवर त्यांचे वर्चस्व राहिले आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातून झालेला त्यांचा विजय हा त्यांच्या राजकीय वाटचालीतील मैलाचा दगड ठरला होता.गेल्या पाच वर्षात चिखलीकर नांदेडमध्ये फारसा करिष्मा करू शकले नसल्याची चर्चा होती. त्यामुळे त्यांचं तिकीट कापलं जाणार असं म्हटलं जात असताना भाजपने अशोक चव्हाणांच्या शिफारसीला बगल देत चिखलीकरांना दुसऱ्यांना संधी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world