महायुतीमध्ये कल्याण पश्चिम विधानसभा मतदार संघ कोणाकडे जाणार यावर इथली सर्व गणितं अवलंबून आहे. मागिल तीन निवडणुकांत इथल्या मतदारांनी वेगवेगळा निकाल दिला आहे. 2009 मध्ये मनसे, 2014 भाजप आणि 2019 मध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला या मतदार संघात यश मिळाले होते. सध्याची राजकीय स्थिती बदलली आहे. शिवसेनेचे विद्यमान आमदार विश्वनाथ भोईर हे एकनाथ शिंदे गटात आहेत. त्यामुळे ही जागा शिंदे गटाच्या पारड्यात जाण्याची दाट शक्यता आहे. या मतदार संघात भाजपचीही ताकद आहे. त्यामुळे माजी आमदार नरेंद्र पवार यांना इथून निवडणूक लढायची आहेत. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटही ताकदीनं मैदानात उतरणार आहे. शिवाय मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथल्या बहूरंगी लढतीत मतदार पुन्हा एकदा नव्या चेहऱ्याला संधी देतात की नाही याकडे सर्वांचे लक्ष आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कल्याण पश्चिम विधानसभेसाठी इच्छूक उमेदवारांनी तयारी सुरु केली आहे. कल्याण पश्चिम विधानसभेत महायुतीचे पारडे जड समजले जाते. त्यामुळेच महायुतीतील शिवसेना -भाजप मधील इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकीत कोणत्या पक्षाला ही जागा सुटते. कोण बंडखोरी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 2019 मध्ये भाजपचे नरेंद्र पवार यांनी बंडखोरी केली होती. त्यांचा पराभव शिवसेनेच विश्वनाथ भोईर यांनी केला. फूटीनंतर राजकीय परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे विश्वनाथ भोईर यांनी ठाकरेंची साथ सोडली आणि एकनाथ शिंदेंना साथ दिली. त्यामुळे यावेळी त्यांच्या समोर ठाकरे गटाचे ही आव्हान असेल. शिवाय भाजपकडूनही या मतदार संघात बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही.
ट्रेंडिंग बातमी - हर्षवर्धन पाटील लढणार की माघार घेणार? इंदापूर विधानसभा कोणाच्या पारड्यात?
2019 मध्ये कल्याण पश्चिम विधानसभा ही शिवसेनेकडे केले. तर 2014 साली महायुतीत ही जागा भाजपकडे होती. त्यावेळी भाजपचे नरेंद्र पवार निवडून आले होते. परत 2019 मध्ये ही जागा शिवसेनेकडे गेली. शिवसेनेकडून उमेदवार आयात केले जाणार असल्याची चर्चा त्यावेळी होती. त्यावेळी शिवसेना पदाधिकारी एकत्र आले. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यथा मांडली. आमच्यापैकी एकाला उमेदवारी द्या. बाहेरच्या उमेदवाराला निवडून देणार नाही. तत्कालीन पालकमंत्री आणि जिल्ह्याचे नेते एकनाथ शिंदे यांना डावलून विश्वनाथ भोईर यांना उमेदवारी दिली गेली. भोईर हे निवडून आले.
ट्रेंडिंग बातमी - केज मतदार संघात भाजपची डोकेदुखी वाढणार? राखीव मतदार संघात कोण बाजी मारणार?
आत्ता शिवसेना फूटीनंतर भोईर हे शिंदे गटाचे आमदार आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांची साथ दिली. त्यामुळे या निवडणूकीत भोईर यांना प्राधान्य दिले जाणार आहे हे खरे आहे. शिंदे गटातील शहर प्रमुख रवी पाटील यांनी निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे भोईर आणि पाटील हे दोघेही निवडणूक प्रचाराला लागले आहेत. शिवाय माजी नगरसेवक समेळ यांनी ही या जागेवर दावा ठोकला आहे. त्यांच्या बरोबर माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी ही निवडणूक लढवण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात उमेदवारीसाठी रस्सीखेच आहे.
ट्रेंडिंग बातमी - गोंदिया विधानसभेत कमळ फुलणार? दोन अग्रवाल एकमेकांना भिडणार?
महायुतीत जरी ही जागा शिवसेना शिंदे गटाला जाणार असली तरी इथे भाजपने जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. भाजपकडून वरुण पाटील आणि प्रेमनाथ म्हात्रे हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. शिवाय माजी आमदार नरेंद्र पवार यांनीही तयारी सुरू केली आहे. 2014 साली या मतदार संघातून नरेंद्र पवार हे विजयी झाले होते. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत त्यांनी शिवसेना उमेदवारा समोर बंडखोरी केली होती. तरीही त्यांना 44 हजाराच्या घरात मतं मिळाली होती. यावेळी पुन्हा ते बंडखोरीच्या तयारीत असल्याचे बोलले जाते. भाजपची मोठी ताकद या मतदार संघात आहे. त्यामुळे भाजप बंडखोर शिंदेंच्या या गडाला तडा देण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.
ट्रेंडिंग बातमी - कदम शपथेला जागणार की मैदानात उतरणार? दापोलीत मुलासाठी बापाची प्रतिष्ठा पणाला
एकीकडे महायुतीत उमेदवारीसाठी रस्सीखेच असताना दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटही ताकदीने मैदानात उतरणार आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून सचिन बासरे, विजय साळवी यांच्या नावाची चर्चा आहे. विजय साळवी यांनी या आधीही निवडणूक लढवली आहे. मात्र त्यांचा अगदी कमी फरकाने पराभव झाला होता. तर काँग्रेसकडून कांचन कुलकर्णी निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीत या जागेमध्ये स्पर्धा असताना मनसेकडे दुर्लक्ष करून इथे चालणार नाही. मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर इथे कामाला लागले आहे. मागील दोन्ही निवडणुकांत त्यांना चांगली मते मिळाली होती. तर 2009 ला ते विजयी झाले होते. भोईर यांच्या प्रमाणे मनसे जिल्हा अध्यक्ष उल्हास भोईर हे इच्छूक आहेत. त्यामुळे हा मतदार संघ कोणाला जातो, कोणाला उमेदवारी मिळते या सर्वावर पुढची गणितं अवलंबून आहेत.
ट्रेंडिंग बातमी - गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीणचा गड राखणार? 3 गुलाबरावांत होणार टक्कर?
2019 मध्ये शिवसेना भाजपचे महायुतीचे विश्वनाथ भोईर हे निवडून आले होते. विश्वनाथ भोईर यांनी भाजपचे बंडखोर नरेंद्र पवार यांचा पराभव केला होता. विश्वनाथ भोईर यांना 65 हजार 480 मते मिळाली होती. नरेंद्र पवार यांना 43 हजार 209 मते पडली होती. तिसऱ्या नंबरवर मनसेचे माजी आमदार प्रकाश भोईर होते. त्यांना 38 हजार 75 मते मिळाली होती. या मतदार संघाने मागील तीन निवडणुकीत वेगवेगळा कौल दिला आहे. मनसे, भाजप आणि शिवसेनेचे आमदार इथून निवडून गेले आहे. मागील तीन निवडणुकीची परंपरा या निवडणुकीतही कायम राहाणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world