जितेंद्र दिक्षित
राज ठाकरे यांचा गेल्या पाच वर्षाचा राजकीय प्रवास पाहिल्या तर वेगवेगळ्या गोष्टी दिसून आल्या आहेत. अगदी नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घेतलेल्या त्यांच्या सभा ही गाजल्या. यासभा मधून त्यांनी लाव रे तो व्हिडीओ हे सर्वांच्याच लक्षात राहीलेली बाब. त्यांनी यामाध्यमातून मोदी काय बोलले होते आणि त्यांनी काय कृती केली हे व्हिडीओच्या माध्यमातून जाहीर सभामधून दाखवून दिले होते. शिवाय त्यांनी मोदी मुक्त भारतची ही घोषणा दिली होती. यानंतर एका जुन्या प्रकरणात राज ठाकरे यांना ईडीची नोटीस आली. ईडी कार्यालयात त्यांना चौकशीसाठी बोलावलं गेलं. तिथं त्यांची तब्बल ८ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर राज यांच्या राजकीय भूमिकेतच बदल दिसून आल्याचं राजकीय निरिक्षक सांगतात. त्यांनी मोदींवर बोलणं सोडलं. विशेष म्हणजे राज यांनी युटर्न घेत थेट मोदींनाच बिनशर्त पाठींबा जाहीर केला.
नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे याचं एक वेगळं नातं आहे. २०११ साली राज ठाकरे यांनी गुजरातचा दौरा केला होता. त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी त्याचं मोदींनी भव्य स्वागत केलं होतं. यावेळी गुजरातच्या विकासाची माहिती देण्यासाठी त्यांच्या बरोबर अधिकारीही देवू केले होते. या अधिकाऱ्यांनी गुजरात मॉडेलचे प्रेझेन्टेशन राज यांना दिले होते. विकासाचे गुजरात मॉडेल बघून राज ठाकरे भारावून गेले होते. असं मॉडेल महाराष्ट्रात राबवलं पाहीजे असंही त्यांनी सांगितलं होतं. शिवाय नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान झाले पाहीजेत असं मतही त्यांनी त्यावेळी व्यक्त केलं होतं.
पुढे २०१४ मध्ये राज ठाकरेंनी लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी भाजप विरोधात उमेदवार देण्याचं टाळलं. मोजक्याच जागांवर त्यांनी निवडणूक लढवली तेही शिवसेने विरोधात. मात्र पुढे मोदींच्या काही धोरणामुळे ठाकरे नाराज झाले. गुजरातमध्ये जाणारे सर्व प्रकल्प, शिवाय नोटबंदी याला राज ठाकरे यांनी विरोध केला. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोदींच्या या धोरणाची चिरफाड केली. यावेळी त्यांनी मोदींच्याच व्हिडीओचा वापर करत मोदी काय बोलले होते आणि नंतर काय केले हेच दाखवून दिलं.
२०२० मध्ये मात्र राज ठाकरे यांनी वेगळी भूमिका घेतली. त्यांनी आपल्या पक्षाचा ध्वज बदलला. पक्षाचा भगवा ध्वज त्यांनी स्विकारला. शिवाय हिंदुत्वाची कास त्यांनी धरली. शिवाय परप्रांतियांचा द्वेश आणि भूमिपुत्र यापासून थोडी फारकत घेत हिंदूत्वाचा मार्ग स्विकारला. त्यामुळे राष्ट्रवादी विचार अशी ओळख त्यांनी निर्माण केली. यामुळे राष्ट्रीय पक्षांबरोबर जाण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. राज यांच्या परप्रांतिय धोरणामुळे उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोक दुखावले गेले होते. पण हिंदूत्ववादी भूमिकेमुळे त्याला वेगळं वळण मिळालं.
राज ठाकरे गेल्या काही दिवसापासून भाजप आणि शिवसेनेबरोबर लोकसभेत युती व्हावी म्हणून चर्चा करत होते. मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. मात्र त्यांनी मोदींना पाठींबा देवू केला. शिवाय विधानसभेच्या तयारीला लागा असा आदेश दिला. मात्र ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूकीत भाजपबरोबर युती होवू शकते असे संकेत त्यांनी दिलेत. त्यामुळे भाजपलाही ठाकरेंच्या रूपानं नवा मित्र मिळणार आहे. त्याचा फायदाही भाजपला होवू शकतो असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world