Babar Azam : भारतीय क्रिकेट टीमनं वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत झालेल्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत विजेतेपद मिळवलंय. टीम इंडियानं एकही सामना न गमावता विजेतेपद पटकावून इतिहास रचलाय. त्यामुळे भारतामध्ये आनंदाचं वातावरण आहे. प्रत्येकजण भारतीय खेळाडूंचं अभिनंदन करतोय. त्याचवेळी शेजारच्या पाकिस्तानमध्ये मात्र मातम पसरलाय. पाकिस्तान क्रिकेट टीम स्पर्धेपूर्वी विजेतेपदाची दावेदार मानली जात होती. प्रत्यक्षात त्यांना सुपर 8 मध्ये प्रवेश मिळवता आला नाही. नवख्या अमेरिकेकडून पराभूत होण्याची नामुश्की त्यांना सहन करावी लागली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाकिस्तान टीमच्या निराशाजनक कामगिरीमुळे त्यांचे माजी खेळाडू संतापले आहेत. त्यांनी टीमवर सडकून टीका केलीय. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आझम (Babar Azam) हा त्यांचं मुख्य लक्ष्य आहे. पाकिस्तानचा माजी कॅप्टन आणि बाबरचा माजी सहकारी शोएब मलिकनंही एका खासगी वाहिनीवर बोलताना बाबर आझमला घरचा आहेर दिलाय.
काय म्हणाला शोएब?
शोएब मलिकनं 'टेन स्पोर्ट्स' वरील कार्यक्रमात सांगितलं, 'आमच्याकडं ज्या दर्जाचं क्रिकेट सुरु आहे, त्यामुळे आपण खूप खाली आहोत. मी फक्त T20 फॉर्मेटबद्दल बोलत आहे. आमचा बेस्ट खेळाडू कोण आहे? आमचा बेस्ट खेळाडू आहे बाबर आझम. मी फक्त टॉप 4-5 टीमबद्दल बोलत आहे. बाबर आझम त्या टीममध्ये फिट होऊ शकतो का? ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंडमधील प्लेईंग 11 मध्ये बाबर आझमचा समावेश करायचा असेल तर त्याचा त्या टीममध्ये समावेश होऊ शकत नाही. हे फक्त याच फॉर्मेटसाठी नाही.'
( नक्की वाचा : भारताच्या ऑस्ट्रेलियावरील विजयानंतर इंझमाम-उल-हकनं केला खळबळजनक आरोप )
बाबर आझमला नेपाळ देखील त्यांच्या टीममध्ये घेणार नाही, असं शोएबनं यावेळी सांगितलं. नुकत्याच संपलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये बाबर आझम पाकिस्तानकडून सर्वाधिर रन करणारा बॅटर आहे. त्यानं 4 मॅचमध्ये 40.66 ची सरासरी आणि 101.66 च्या स्ट्राईक रेटनं 122 रन केले. बाबरच्या नेतृत्त्वाखालीच पाकिस्तान टीमचा अमेरिकेविरुद्ध पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भारताविरुद्धचा सामना गमावला. पाकिस्ताननं त्यानंतर कॅनडा आणि आयर्लंडविरुद्ध विजय मिळवला. पण, त्यानंतरही सुपर-8 मध्ये प्रवेश करण्यात त्यांना अपयश आलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world