अहिल्यानगरमधील राहाता तालुक्यातील धनगरवाडीच्या माळरानावर सध्या जणू ‘प्रति पंढरी’च अवतरली आहे. वारकऱ्यांचा कुंभमेळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाला लाखो भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतोय. सप्ताहाच्या सहाव्या दिवशीही भाविकांचा ओघ कायम असून भजन-कीर्तनाचा अखंड गजर, टाळ-मृदंगाचा निनाद आणि महाप्रसादाच्या पंगतींमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक या सप्ताहासाठी दाखल झाले असून विठ्ठलनामाच्या जयघोषाने धनगरवाडी दुमदुमून गेली आहे. या भव्य सप्ताहाच्या निमित्ताने सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी सप्ताहाचे आध्यात्मिक महत्त्व आणि यंदाच्या आयोजनाची वैशिष्ट्ये उलगडून सांगितली. पाहूयात त्यांच्याशी केलेली ही विशेष बातचीत.