Global News| युरोपियन देश आणि अमेरिकेवर चीनचा निशाणा, नेमका कशाबाबत चीननं दिला इशारा? | NDTV मराठी

रशिया युक्रेन युद्धात युक्रेनाला शस्त्र पुरवठा करणाऱ्या युरोपियन देश आणि अमेरिकेच्या भूमिकेवर चीननं थेट टीकास्त्र सोडलं. युक्रेनला शस्त्र पुरवून युद्धजन्य परिस्थितीला खतपाणी घातलं जातंय असं चीननं म्हटलंय.. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत चीनचे स्थायी उपप्रतिनिधी गेंग शुआंग यांनी चीनची ही भूमिका मांडली. रशिया युक्रेनच्या युद्ध लांबल्यानं सामान्य नागरिकांच्या जिविताची मोठी हानी होतेय आणि ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चाललीय. चीनसाठी ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचं शुआंग यांनी त्यांच्या भाषणात म्हटलंय. दोन्ही बाजूंनी थेट संवाद सुरु करण्याला सहमती दाखवली असली, तरी घातक शस्त्राचां पुरवठा शांतीप्रक्रियेसाठी मोठा अडथळा ठरतोय. प्रत्यक्ष युद्धभूमीत वापरल्या जात असलेल्या घातक शस्त्रांची संख्या वाढतेय. त्यामुळे सर्वच पक्षांनी शस्त्रसंधी आणि शांतीप्रक्रियेसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी हातभार लावावा असं आवाहन शुआंग यांनी चीनच्या वतीनं केलंय. युद्ध सुरु झाल्यापासून चीननं रशिया किंवा युक्रेन दोघांनाही कोणत्याही प्रकारे संहारक शस्त्रांचा पुरवठा केलेला नाही हे सुद्धा अधोरेखीत करण्यास चीनचे अधिकारी विसरले नाहीत. त्याचप्रमाणे अमेरिकेनं युक्रेनला केलेल्या शस्त्र पुरवठ्याचा वारंवार उल्लेख यावेळी करण्यात आला.

संबंधित व्हिडीओ