कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. पावसामुळे शहरातील काही सखल भागांमध्ये पाणी साचले असून नागरिकांना आणि वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका कल्याण-नगर महामार्गाला बसला आहे. रायतेजवळ महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.दरम्यान, पावसाचा जोर वाढल्यास सखल भागांमध्ये आणखी पाणी साचण्याची शक्यता असून प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.