दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेने अहमदाबाद येथील अदाणी फाउंडेशनसोबत सामाजिक बांधिलकी जोपासत जागतिक दर्जाची आरोग्यसेवा, शिक्षण आणि पायाभूत सुविधा देशांतर्गत अधिक कार्यक्षमतेने विकसित करण्याच्या उद्देशाने एकत्रित वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची संयुक्त घोषणा दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे विश्वस्त व अभिमत विद्यापीठाचे प्रधान सल्लागार सागर मेघे आणि अदाणी समूहाचे संचालक डॉ. मलय महादेविया यांनी केली. सावंगी मेघे येथे झालेल्या या संयुक्त बैठकीला कुलपती दत्ता मेघे, प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, मेघे समूहाचे संचालक राघव समीर मेघे, कुलगुरू डॉ. ललित वाघमारे तसेच मेघे व अदाणी समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मेघे समूह व अदाणी फाउंडेशनमध्ये झालेल्या या करारानुसार दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेच्या ध्येयधोरणांना कायम ठेवत दर्जेदार, नाविन्यपूर्ण आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाचा समावेश असलेले जागतिक दर्जाचे केंद्र विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे