Satara Viral VIdeo News: साताऱ्यातील पाटण तालुक्यातून फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उत्तर प्रदेश पासिंगच्या दुचाकींवरून गावागावात फिरणारे तीन उत्तर भारतीय व्यक्ती लॉटरी स्कीमच्या नावाखाली स्थानिक नागरिकांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे एका व्हिडीओतून समोर आले आहे. पाटण तालुक्यातील एका व्यक्तीने या फसवणुकीच्या प्रकाराचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. 60 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
लॉटरीच्या नावाखाली महागड्या वस्तूंचे आमिष
या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, तीन व्यक्ती बाईकवर काही सामान घेऊन गावागावांमध्ये फिरत आहेत. त्यांच्याकडे असलेल्या सर्व बाईक्स उत्तर प्रदेश पासिंगच्या आहेत. चौकशीदरम्यान त्यांनी आपण 10 दिवसांपूर्वीच पाटण तालुक्यात आलो असून, 11 व्या दिवसापासून हा व्यवसाय सुरू केल्याचे सांगितले. ते घरोघरी जाऊन नागरिकांना 200 रुपयांचे कुपन विकत होते आणि लॉटरीद्वारे फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, एसी अशा महागड्या वस्तू जिंकण्याची संधी मिळेल, असा दावा करत होते.
पाहा VIDEO
(नक्की वाचा-Chhatrapati Sambhajinagar: लग्न करुन घरी निघाले, रस्त्यात चौघांनी कार अडवली अन् डोळ्यासमोर नवरी गायब!)
उडवाउडवीची उत्तरे आणि फसवणूक उघड
राहुल शेडगे नावाच्या एका स्थानिक व्यक्तीने या तिघांना अडवले आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल विचारपूस केली. राहुल शेडगे यांच्या प्रश्नांवर या लोकांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. लॉटरीमधील सर्व वस्तू नेमक्या कुठे आहेत, असे विचारले असता, त्यांनी त्या वस्तू पाटणमधील एका गोडाऊनमध्ये असल्याचे सांगितले. मात्र, राहुल यांनी 'आम्ही पाटणला जाऊन वस्तू बघू' असे म्हटल्यावर त्यांनी लगेच आपले म्हणणे बदलले आणि 'आमचे गोडाऊन कोल्हापूरला आहे', असे खोटे सांगितले.
जेव्हा राहुल यांनी त्यांच्याजवळ असलेले 200 रुपयांचे कुपन स्क्रॅच करायला लावले, तेव्हा त्यातून फक्त एकच छोटे गिफ्ट निघत होते. लॉटरीमध्ये सर्व वस्तू लागतील, असे आश्वासन ते नागरिकांना देत असले तरी प्रत्यक्षात ते एक प्रकारची पद्धतशीर फसवणूक करत असल्याचे स्पष्ट झाले.
(नक्की वाचा- Shocking! प्रेमविवाहानंतर हुंड्यासाठी छळ, IAS अधिकाऱ्याच्या मुलीने संपवलं जीवन)
पोलीस कारवाईची मागणी
या व्हिडिओमध्ये राहुल शेडगे यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, बाहेरून आलेले हे लोक धंद्यांच्या नावाखाली मराठी माणसाची फसवणूक करत आहेत. 'हे लोक बाहेरून येतात आणि इथे येऊन धंद्यांच्या नावाखाली मराठी माणसाची फसवणूक करतात' असे सांगत राहुल शेडगे यांनी या तिन्ही लोकांवर कठोर पोलीस कारवाई करण्याची मागणी केली आहे.
राहुल शेडगे यांनी हा व्हिडीओ 8 नोव्हेंबर रोजी इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या व्हिडिओला आतापर्यंत जवळपास 2 लाख 35 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे, तर *60* लाखांहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. स्थानिकांना अशा अनोळखी व्यक्तींच्या आमिषांना बळी न पडण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world