जाहिरात

हंटर बायडेनला गंभीर गुन्ह्यात माफी, अदाणींवर आरोप करणाऱ्या अमेरिकेच्या कायदा विभागाची पोलखोल

बायडेन यांनी याच वर्षी जून महिन्यात आपल्या मुलाबद्दल बोलताना म्हटले होते की, ते हंटरला कधीही माफ करणार नाही आणि त्याची शिक्षाही कमी करणार नाही.

हंटर बायडेनला गंभीर गुन्ह्यात माफी, अदाणींवर आरोप करणाऱ्या अमेरिकेच्या कायदा विभागाची पोलखोल
नवी दिल्ली:

बेकायदेशीरित्या शस्त्रास्त्रे बाळगणे आणि करचोरीच्या प्रकरणांत अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांनी त्यांचा मुलगा हंटर (Hunter Biden) याला माफी दिली आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये न्यायालयाने हंटरला दोषी ठरवले होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतलेल्या या निर्णयानंतर अमेरिकेतील राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. या माफीनंतर, अदाणी समूहाबद्दल आकस ठेवत करण्यात आलेल्या कारवाईबद्दलही प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ लागले आहे. 

नक्की वाचा : "अदाणी कुटुंबियांच्या कोणत्याही सदस्यांवर लाचखोरीचा आरोप नाही", अदाणी समूहाचं स्पष्टीकरण

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सदर प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करत हे 'न्यायाचे अपयश' असल्याचे म्हटले आहे. बायडेन यांनी याच वर्षी जून महिन्यात आपल्या मुलाबद्दल बोलताना म्हटले होते की, ते हंटरला कधीही माफ करणार नाही आणि त्याची शिक्षाही कमी करणार नाही. राणा भीमदेवी थाटात या घोषणा करणाऱ्या बायडेन यांनी घेतलेल्या या यु-टर्ननंतर अमेरिकेच्या कायदा मंत्रालयाच्या निष्पक्ष कारभारावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बायडेन यांनी आपल्या निर्णयाचे पोकळ समर्थन करताना म्हटले आहे की आपल्या मुलाविरोधातील प्रकरणे ही राजकीयदृष्ट्या प्रेरीत होती आणि हंटरचे खच्चीकरण करण्यासाठी ती रेटून धरली जात होती. जो बायडेन यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अमेरिकेच्या न्यायप्रक्रियेला राजकीय मंडळी कशी वाकवतात याची खमंग चर्चा सुरू झाली आहे.  सोबतच अदाणी समूहाविरोधात बायडेन सरकारने केलेली कारवाई ही सूडाच्या राजकारणाचाच एक भाग असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. यामुळेच ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर अदाणींविरोधातील आरोप मागे घेतले जाऊ शकतात असा कयास तज्ज्ञांनी बांधला आहे. 

नक्की वाचा : 'प्रत्येक हल्ला आम्हाला भक्कम करत आहे', अमेरिकेतील आरोपांना गौतम अदाणींचं उत्तर

वकील आणि अमेरिकन 'डीप स्टेट' वर सडकून टीका करणाऱ्या कश्यप पटेल यांनी अमेरिकेतील कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा आणि गुप्तचर यंत्रणांमध्ये व्यापक बदल करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. पटेल हे ट्रम्प सरकारमध्ये एफबीआयचे संचालक म्हणून नेमण्यात आलेले आहेत हे विशेष. 

नक्की वाचा :'आम्हाला अमेरिकेकडून कोणतीही सूचना नाही', अदाणी प्रकरणावर परराष्ट्र मंत्रालयाचं स्पष्टीकरण

अमेरिकेतील कायदा विभाग तसेच सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशनने (SEC)  अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी, सागर अदाणी आणि विनित जैन यांच्याविरोधात आरोप करत न्यूयॉर्क जिल्हा न्यायालयात दिवाणी खटला दाखल केला आहे.  अमेरिकेच्या कायदा विभागाने याबाबत जाहीरपणे बोलताना जोपर्यंत एखाद्या व्यक्तीवरील आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला दोषी ठरविले जाऊ शकत नाही असे म्हटले होते. गौतम अदाणी , सागर अदाणी , विनंती जैन यांच्याविरोधात केवळ आरोप करण्यात आले असताना त्यांच्याविरोधात राळ उठवण्यात आली आहे. दुसरीकडे दोषी ठरविण्यात आलेल्या हंटर बायडेनला दोषमुक्त करून जो बायडेन मोकळे झाले आहेत. सूडबुद्धीपोटी घेतला गेलेला हा दुटप्पीपणा गंभीर असल्याचे जाणकार मंडळींचे म्हणणे आहे. अदाणी समूहाने त्यांच्यावर करण्यात आलेले सगळे आरोप खोटे, खोडसाळ आणि बिनबुडाचे असल्याचे म्हटले होते. अदाणी ग्रीन एनर्जींने 27 नोव्हेंबर रोजी एक निवेदन जारी करत लाचखोरीचे सर्व आरोप फेटाळले होते. अदाणी कुटुंबियांच्या कोणत्याही सदस्यांवर लाचखोरीचा आरोप नाही, असं अदानी ग्रीन एनर्जींने स्पष्ट केलं आहे. गौतम अदाणी, सागर अदाणी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत कोणतेही आरोप नाहीत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: