बारा ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून नाशिकच्या त्र्यंबकेश्वराची ओळख आहे. सध्या त्र्यंबकेश्वरचे वातावरण तापले आहे ते निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे. 'भाऊ', 'दादा' तुम आगे बढोच्या घोषणाबाजीने त्र्यंबकनगरी दुमदुमून गेली आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारी त्र्यंबकेश्वर नगरपरिषद निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. याचं कारण म्हणजे सत्ताधारी महायुतीचेच तीन उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकलेत.
नक्की वाचा: लातूरमध्ये देशमुख काका-पुतण्यातील राजकीय संघर्ष चिघळला, अमित देशमुखांच्या आदेशानंतर पक्षात खळबळ
महायुतीतील तीनही पक्षांचे उमेदवार आमने सामने
नाशिक कुंभमेळा वर्षभरावर ठेपलाय, राज्य सरकार त्यासाठी जोरात तयारीला लागली आहे. एकीकडे कुंभमेळ्यासाठीची तयारी सुरू असताना दुसरीकडे त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेचे वातावरण तापलंय. या नगरपरिषदेवर आपला झेंडा फडकवण्यासाठी महायुतीच्या तीनही पक्षांनी जोर लावलाय. खासकरून भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे, कारण आहे आगामी कुंभ मेळा. मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कैलास घुले यांना रिंगणात उतरवले आहे. कैलास घुले यांच्यापुढे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या त्रिवेणी तुंगार तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे सुरेश गंगापूत्र यांनी आव्हान उभे केलं आहे. भाजपकडून ही निवडणूक महायुती म्हणून लढवली जावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले होते मात्र यात त्यांना यश आले नाही.
नक्की वाचा: 'महिलांसाठी 30 कोटींचे कर्ज द्या!' पिंपरी-चिंचवडच्या नेत्याची थेट जागतिक बँकेकडे मागणी
त्र्यंबकेश्वरचा विकास कळीचा मुद्दा
प्रयागराज येथील कुंभ मेळ्याला अभूतपूर्व यश मिळाले होते. या कुंभ मेळ्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने प्रचंड तयारी केली होती. आयोजनाचा स्तर उंचावल्याने नाशिक कुंभ मेळ्याकडूनही तशाच अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे. राज्यात भाजपचं सरकार असल्याने कुंभ मेळ्याच्या आयोजनात कोणतीही कसर राहू नये असा सरकारचा प्रयत्न असेल. त्यासाठी त्र्यंबकेश्वर नगरपरिषद आपल्या ताब्यात असणं हे भाजपसाठी गरजेचं आहे. यामुळेच भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर हे इथल्या समाजकारण, अर्थकारण आणि राजकारणाचं केंद्रस्थान आहे. हिंदू धर्मियांसाठी प्रचंड श्रद्धेचं स्थान असलेल्या त्र्यंबकेश्वरचा पाहिजे तसा विकास झालेला नाहीये. पिण्याचे पाणी, सांडपाण्याची व्यवस्था, अस्वच्छता, भाविकांसाठी पुरेशा सोयी नसणे या इथल्या मूलभूत समस्या आहेत. यामुळे त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेवर वर्चस्व मिळवणे ही भाजपसाठी पराकोटीची आवश्यक बाब बनली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world