गेल्या अनेक दिवसांपासून ज्याची मुंबईकर चातकाप्रमाणे वाट पाहत होते, तो पाऊस अखेर बरसला आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुंबईत पावसाचं धुमशान पाहायला मिळालं. भारतीय हवामान खात्याने मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे या जिल्ह्यातील काही ठिकाणी अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
पालघर, ठाणे आणि मुंबईत या तिन्ही भागात पावसाचा जोर कालपेक्षा कमी राहण्याचा अंदाज असला तरी दिवसभर थोड्या थोड्या वेळाने पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरीत काही ठिकाणी मुसळधार पाऊस असेल. या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाज असून काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पुणे आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. पश्चिम महाराष्ट्रातील पठार भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. मराठवाड्यात देखील आज काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत असून वाऱ्याचा वेग देखील 30-40 किमी प्रति तासाने अपेक्षित आहे. यवतमाळ, वर्धा, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि अमरावतीसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये गेल्या 24 तासात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. कुलाब्यात मागील 24 तासात 75 मिमी पावसाची नोंद तर सांताक्रुजमध्ये 67 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज मुंबईत मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. कालपेक्षा पावसाचा जोर कमी असेल. मराठवाडा सोडला तर सर्वत्रच चांगला पाऊस असून जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यात सर्वत्र जोरदार सरी बरसतील असं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.