Rain Live : पावसाची नॉन स्टॉप बॅटिंग, कुठे शाळांना सुट्टी तर कुठे नद्यांनी ओलांडली इशारा पातळी

जोरदार पाऊस सुरू असून पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
मुंबई:

महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून दिवसभर (Maharashtra Rain) पावसाने तुफान बॅटिंग केली आहे. जोरदार पाऊस सुरू असून पुढील काही दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून नॉन स्टॉप पाऊस सुरू आहे. सकाळपासून जोरदार वाऱ्यासह तुफान पाऊस सुरू असल्याने सकाळी नोकरीवर जाणाऱ्या वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान खबरदारी म्हणून गडचिरोली, रायगड आणि नागपूर जिल्ह्यातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. शिवाय, मुंबईतील पवई तलावाचा जलस्तर वाढलाय, त्यामुळे पर्यटकांना पवई तलावाच्या परिसरात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

याशिवाय रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबईसर मुंबई उपनगर, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र अशा सर्वच महाराष्ट्रातील भागात मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. नागपूरमध्येही मुसळधार असून पावसामुळे शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

भंडाऱ्यात मुसळधार पावसामुळे आज शाळा-महाविद्यालयांना सुट्टी
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. तर भंडाऱ्यात जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाचा कहर पाहता काही भंडारा जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. हवामान विभागाने रेड अलर्ट देण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यात ग्रामीण भागात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तनात आली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिमाण शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये, याकरिता जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी शाळा व महाविद्यालयाला सुट्टी जाहीर केली आहे.

Advertisement

रायगड जिल्ह्यातील महाड, माणगाव, पोलादपूरसह कर्जत तालुक्यातील शाळांना आज सुट्टी जाहीर
आज रायगड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पाऊसमुळे महाड, माणगाव, पोलादपूरसह कर्जत तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज झालेल्या पावसामुळे महाड तालुक्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. तसेच सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून कुंडलिका नदीने इशारा पातळी गाठली आहे. यातच उद्या ही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने चार तालुक्यातील शाळांना उद्या सुट्टी जाहीर केली. वर्धा जिल्ह्याला आज येलो अलर्ट देण्यात आला असून जल प्रकल्प, बंधारे, तलाव भरले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास त्या भागातील वाहतूक बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

वर्धा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
आज वर्धा जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे. दोन दिवस मुसळधार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील जल प्रकल्पामध्ये पाण्याची आवक वाढली असून काही प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Advertisement

रत्नागिरी जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट.. 
गेले दोन दिवस जिल्ह्याला मुसळधारपणे झोडपणाऱ्या पावसाची रात्रीपासून विश्रांती घेतली आहे. मात्र अद्यापही जगबुडी, काजळी, कोदवली, मुचकुंदी या नद्या इशारा पातळी ओलांडून वाहत आहेत. राजापूर शहारामधील जवाहर चौकात पुराचं पाणी अद्यापही कायम आहे. जिल्ह्याला आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. आज पुन्हा पावसाचा जोर असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

Advertisement

वसई विरारला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस 
ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील तानसा, मोडक सागर आणि मध्य वैतरणा धरणाच्या परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीनही धरणांतील पाणीपातळीत चांगली वाढते आहे. तर, वसई विरार आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणारे धामणी धरण 50 टक्क्यांपेक्षा जास्त भरलं आहे. 

नक्की वाचा - रत्नागिरीला मुसळधार पावसाने झोडपलं, अनेक नद्यांनी धोका पातळी ओलांडली

धरणातील पाणीसाठा

1) धामणी धरण ( सूर्या नदीवरील धरण) 50 टक्के भरले.

वसई विरार आणि मीरा-भाईंदर महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणारे धरण.

2) मोडक सागर धरण 
65.46% टक्के भरले 

3) तानसा धरण  
84.11 % भरले 

4) मध्यवैकरणा धरण         
41.52% भरलं. 

कोल्हापूर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ
कोल्हापुरात मुसळधार असा पाऊस सुरू आहे. आज सकाळपासून पावसाची थोडीफार उघडीप आहे. मात्र पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 38.7 फुटांवर पोचली आहे. आज 39 फुटापर्यंत इशारा पातळी गाठण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासन संभाव्य पूर परिस्थितीसाठी सज्ज असून पंचगंगा तालीम ते शिवाजी पूल आणि कोल्हापूर-गगनबावडा मार्ग बंद आहे.