जाहिरात
This Article is From Apr 29, 2024

माढ्यासाठी भाजपची साम-दाम-दंड-भेद ची रणनिती, शरद पवारांचा आणखी एक मोहरा गळाला?

अभिजीत पाटील चेअरमन असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा सध्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. कारखान्यावर सध्या ४०० कोटींचं कर्ज आहे.

माढ्यासाठी भाजपची साम-दाम-दंड-भेद ची रणनिती, शरद पवारांचा आणखी एक मोहरा गळाला?
विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत
मुंबई:

45 पेक्षा अधिक खासदार निवडून आणण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या भारतीय जनता पक्षाला यंदाच्या निवडणुकीत कडवी लढत मिळते आहे. माढा मतदारसंघात भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली. परंतु निंबाळकर यांना पक्षांतर्गत विरोध व्हायला लागला. धैर्यशील मोहीते पाटील यांनी भाजपची साथ सोडत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. धैर्यशील यांना राशप गटाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर भाजप बॅकफूटवर गेलेली पहायला मिळाली.

परंतु माढ्याची जागा राखण्यासाठी भाजपने साम-दाम-दंड-भेद ची रणनिती अवलंबताना दिसत आहे. याचाच एक भाग म्हणून शरद पवार यांचे निकटवर्तीय आणि विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांना भाजप आपल्याकडे खेचून घेण्याच्या तयारीत आहे.

अभिजीत पाटलांनी घेतली फडणवीसांची भेट -

अभिजीत पाटील यांनी नुकतीच उप-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर अभिजीत पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. अभिजीत पाटील यांना भाजपमध्ये घेण्यामागे मोठी रणनिती असल्याची चर्चा स्थानिक राजकारणात बोलून दाखवली जात आहे.

हे ही वाचा - उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात 'शिवसेना Vs शिवसेना'; महायुतीच्या जागावाटपाबाबत मोठी अपडेट

पाटलांचा कारखाना आर्थिक संकटात -

अभिजीत पाटील चेअरमन असलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा सध्या आर्थिक संकटात सापडलेला आहे. कारखान्यावर सध्या ४०० कोटींचं कर्ज आहे. या थकबाकीमुळेच राज्य सहकारी बँकेने कारखान्याची तीन गोदामं आणि काही मालमत्ता जप्त केली आहे. कारखाना सुरळीत चालू ठेवण्यासाठी सरकारी मदत मिळणं गरजेचं आहे. याच सरकारी मदतीच्या जोरावर अभिजीत पाटील यांना सोबत घेऊन माढ्याची गणित आपल्या बाजूने जुळवून आणण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय.

शेतकरी सभासदांच्या हितासाठी पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सध्या बोलून दाखवली जात आहे. विठ्ठल सहकारी कारखाना सुरु करण्यात अभिजीत पाटील यांना भाजप सरकारने मदत केली होती. परंतु कारखाना सुरु झाल्यानंतर अभिजीत पाटील यांनी राष्ट्रवादीची साथ देत भाजपला ठेंगा दाखवला होता.

धवलसिंह मोहीते पाटलांचाही निंबाळकरांना पाठींबा -

धैर्यशील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शरद पवारांनी भाजपला शह दिल्याची चर्चा रंगली होती. परंतु भाजपने मोहीते पाटील घराण्यातील महत्वाची व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काँग्रेसच्या धवलसिंह मोहीते पाटील यांचा पाठींबा मिळवत पुन्हा पारडं आपल्या दिशेने झुकवलं. काँग्रेसचे स्थानिक नेते असलेल्या धवलसिंह यांची धैर्यशील यांच्या उमेदवारीवर नाराजी होती. याच नाराजीतून धवलसिंह यांनी रणजितसिंह निंबाळकरांना पाठींबा दिल्याचं बोललं जातंय.

याव्यतिरीक्त माढ्यातील छोटे-छोटे नेते आणि विविध समाजातील लोकांना आपल्या दिशेने वळवून घेण्यातही भाजप नेत्यांना यश आलं आहे. त्यामुळे माढ्याची जागा आपल्याकडे राखण्यात भाजप यशस्वी ठरतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com