महायुतीचं जागा वाटप अडलं? भाजपचा नवा प्रस्ताव, दादा-भाई काय करणार?

जाहिरात
Read Time: 3 mins
मुंबई:

महायुतीचे जवळपास 9 जागांवर अडलं आहे. याजागांवर कोणताही तोडगा निघत नाही. जागा आपल्यालाच मिळाली पाहिजे यासाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अडून बसला आहे. त्यामुळे शिमगा झाला, गुढीपाडवाही उरकला पण जागा वाटपावर एकमत काही झालेले नाही. त्यात आता भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार गटाला एक नवा प्रस्ताव दिला आहे. त्यावर शिंदे - पवार काय निर्णय घेतात यावर याजागांचे भवितव्य ठरणार आहे.   

साताऱ्याच्या बदल्यात नाशिक 
सातारा लोकसभेतून कोण निवडणूक लढणार हे अजूनही स्पष्ट झालेले नाही. अजित पवार या जागेसाठी आग्रही आहेत. नितीन पाटील यांना अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्याची तयारी सुरू आहे. नितीन पाटील हे सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. आमदार मकरंद पाटील हे त्यांचे बंधू आहेत. मात्र याजागेवर भाजपनेही दावा केला असून उदयनराजेंसाठी ही जागा मिळावी असा भाजपचा आग्रह आहे. तर दुसरीकडे नाशिकच्या जागेवरही अजित पवारांनी दावा केला आहे. तिथे छगन भुजबळांना उभे करण्याची रणनिती आहे. त्याला भाजपचा विरोध नाही. त्यामुळे भाजपने अजित पवारांकडे एक प्रस्ताव दिला आहे. त्यात साताऱ्याच्या बदल्यात नाशिकची जागा घ्यावी असं सांगण्यात आले आहे. नाशिकची जागा ही शिंदेंच्या शिवसेनेकडे आहे. तिथे हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार आहेत. त्यांच्या उमेदवारीची अजून घोषणा झाली नाही. त्यामुळे भाजपने शिंदेंना ही जागा सोडण्यासाठी तयार केल्याचेही बोलले जात आहे. आता चेंडू अजित पवारांच्या कोर्टात आहे. त्यामुळे ते साताऱ्याची जागा सोडणार का याकडे सर्वांचे लक्ष आहे.    

Advertisement

हेही वाचा -  बोअरवेल कोरड्या, विहीरी आटल्या, पालघरमध्ये पाणी टंचाईच्या झळा

एकनाथ शिंदेंनाही भाजपचा प्रस्ताव
ठाण्याच्या जागेसाठी भाजप कमालीचा आक्रमक झाला आहे. कोणत्याही स्थितीत ही जागा भाजपने लढवाली असा आग्रह होत आहे. त्यामुळे भाजपने ठाण्याच्या बदल्यात कल्याण देवू केले आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी तयारी दर्शवलेली नाही असे समजत आहे. त्यामुळेच फडणवीसांनी कल्याणचा उमेदवार कोण असेल हे जाहीर केल्यानंतरही शिवसेनेने त्यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केलेली नाही. शिवाय संभाजीनगरसाठीही भाजप अडून बसली आहे. नाशिकचीही जागा हातून जाणार अशी स्थिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे समोर पेच निर्माण झाला आहे.  

Advertisement

हेही वाचा -  'आणखी एका जागतिक वावटळीसाठी तयार व्हा' उदय कोटक थेट बोलले


वाद असणारे 9 मतदार संघ कोणते? 
महायुतीत नऊ मतदार संघाबाबत एकमत होवू शकलेले नाही. त्यात सातारा, नाशिक, ठाणे, पालघर, दक्षिण मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, रत्नागिरी- सिंधुदुर्ग आणि छत्रपती संभाजीनगर मतदारसंघांबाबतही रस्सीखेच सुरू आहे. साताऱ्याच्या जागेवरून भाजप राष्ट्रवादीत रस्सीखेच आहे. ठाण्याच्या जागेवरून शिवसेना- भाजपात आग्रही आहेत. तर संभाजीनगरबाबतही तिच स्थिती आहे.  रत्नागिरी सिंधुदुर्गचा तिढाही कायम आहे. असं असलं तरी या मतदार संघात संभाव्य उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला आहे.

Advertisement

हेही वाचा - पेट्रोल, गॅस नंतर आता फोन सेवा ही महागणार? वाचा कारण काय?

मविआचे जागा वाटप जाहीर
एकीकडे महायुतीचे जागावाटप अडले असताना दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीने जागा वाटपाबाबत एकमत केले आहे. त्यानुसार शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला 21 जागा, काँग्रेसला 17 तर शरद पवारांना 10 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महायुतीचे अंतिम जागा वाटप कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र येत्या दोन तीन दिवसात याची घोषणा केली जाईल असं भाजपच्या सुत्रांकडून सांगितले जात आहे. 

हेही वाचा - अजितदादांच्या 'पवार कार्ड'वर शरद पवारांची नवी खेळी! म्हणाले....