राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (NDA) नेते म्हणून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची निवड झालीय. मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सत्तास्थापनेसाठी दावा सादर केला आहे. नरेंद्र मोदी रविवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. पण, यंदा भाजपाला स्वबळावर बहुमत नाही. त्यामुळे भाजपाला एनडीएमधील घटकपक्षांवर अवलंबून राहावं लागणार आहे. नव्या समीकरणात घटक पक्षांना किती मंत्रिपदं मिळणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन पक्ष एनडीएमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेचे 7 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 खासदार निवडून आला आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कारकिर्दीमध्ये (Modi 3.O) शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना सुरुवातीला 1 मंत्रिपद मिळेल, अशी माहिती 'NDTV मराठी' ला सुत्रांनी दिलीय. हे दोन्ही मंत्रिपद कॅबिनेट दर्जाची असतील अशी माहिती आहे.
( नक्की वाचा : फडणवीसांच्या राजीनामा प्रस्तावावर अमित शाहांकडून आलं उत्तर, म्हणाले.... )
कोण होणार मंत्री ?
राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल यांचं नाव आघाडीवर आहे. अजित पवार यांनी शरद पवारांपासून बाजूला होत नवा गट स्थापन करण्यात पटेल यांची मोठी भूमिका आहे. दिल्लीतील राजकारणाचा त्यांना मोठा अनुभव आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारमध्येही पटेल मंत्री होते. आता नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातही त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
( नक्की वाचा : Explainer नितीश कुमार, नायडूंना भाजपाकडून लोकसभा अध्यक्षपद आणि अर्थमंत्रालय का हवंय? )
शिवसनेतून कुणाची नावं चर्चेत
शिवसनेच्या खासदारांमध्ये प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे हे वरिष्ठ आहेत. त्यामुळे त्यांना संधी दिली जाईल अशी चर्चा आहे. कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांचं देखील नाव मंत्रिपदासाठी चर्चे आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असल्याने केंद्रात मुलाला पण मंत्रीपद देण्याचे ते टाळतील. शिंदे यांनी पक्षाच्या बैठकीत तसे संकेत दिल्याचीही माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेकडून प्रतापराव जाधव आणि श्रीरंग बारणे यांचं नाव आघाडीवर आहे. त्याचवेळी राज्यसभेवर असलेले मिलींद देवरा यांचे नावही पुढे येवू शकते. देवरा मुंबईचे असल्यानं आगामी महापालिका निवडणुकीचा विचार करुन त्यांना संधी मिळू शकते.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world