अमोल गावंडे/ बुलडाणा
बुलडाणा येथे काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आल्याचे पाहायला मिळाले. खामगाव येथील जे. व्ही. मेहता शाळेच्या पटांगणावर महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ रविवारी (21 एप्रिल) सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक उपस्थित होते. दरम्यान सभा आटोपल्यानंतर काँग्रेसचे नेते-माजी आमदार दिलीपकुमार सानंदा आणइ जिल्हा काँग्रेस सेवा दलाचे नेते तेजेंद्रसिंह चव्हाण यांच्यामध्ये बाचाबाची व किरकोळ स्वरुपात हाणामारी झाली. यावेळेस सानंदा समर्थकांनी चव्हाण यांच्या गाडीची काचही फोडली. प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस नेते सानंदा यांनी चव्हाण यांच्यासोबत बाचाबाची केली, त्यांच्या गाडीची काचही फोडली. घडल्या प्रकारास चव्हाण यांनीही प्रतिउत्तर दिल्याचे म्हटले जात आहे.
(नक्की वाचा : 'उद्धव ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडलंय'; राधाकृष्ण विखे पाटलांची टीका)
नेमके काय घडले?
बुलडाणा जिल्ह्यातील खामगावामध्ये रविवारी (21 एप्रिल) महाविकास आघाडीचे उमेदवार नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुकुल वासनिक व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपसह विरोधकांवर जोरदार टीका केली. स्थानिकांनी सभेला मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
(नक्की वाचा : रांची येथे INDIA आघाडीच्या रॅलीमध्ये दोन गटात हाणामारी)
दरम्यान काही वेळाने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामधील दोन गटांतील वाद चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. तेजेंद्रसिंह चव्हाण यांना व्यासपीठावरील पास देण्यात आलेले नव्हते तरीही ते मंचावर उपस्थित राहिल्याने माजी आमदार दिलीपकुमार सानंदा व चव्हाण यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. थोड्या वेळाने या वादाचे पर्यावसान हाणामारीमध्ये झाले. तेजेंद्रसिंह चव्हाण कारमध्ये असताना सानंदा यांनी त्यांच्यावर हल्ला केला. तर सानंदा यांच्या समर्थकांनी चव्हाण यांच्या कारची तोडफोड केली. अचानक झालेल्या या घटनेने व्यासपीठाच्या मागील बाजूस गोंधळ निर्माण झाला होता.
(नक्की वाचा : उंटावरुन शेळ्या, वाघाचं कातडं ते रिंगमास्टर; डोंबिवलीत मुख्यमंत्र्यांची ठाकरेंविरोधात टोलेबाजी)
VIDEO : विनायक राऊत प्रतिमुख्यमंत्री ते उद्धव ठाकरेंकडून पवारांची लाचारी, केसरकर स्पष्ट बोलले
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world