जाहिरात

Maharashtra Election Result : ऐतिहासिक विजयाचे 'धुरंधर शिल्पकार'! भाजपच्या अभूतपूर्व यशामागे नेमकं गुपित काय?

Maharashtra Election Result 2026 भाजपाच्या विजयामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकासाचा दृष्टिकोन आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे सूक्ष्म नियोजन ही दोन मुख्य कारणे ठरली आहेत.

Maharashtra Election Result : ऐतिहासिक विजयाचे 'धुरंधर शिल्पकार'! भाजपच्या अभूतपूर्व यशामागे नेमकं गुपित काय?
Maharashtra Election Result 2026 : महापालिका निवडणुकीत भाजपानं मोठं यश मिळवलं आहे.
मुंबई:

Maharashtra Election Result 2026 : राज्यात महानगरपालिका निवडणुकीच्या रणसंग्रामात भारतीय जनता पक्षाने मिळवलेला विजय हा ऐतिहासिक मानला जात आहे. या विजयामागे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विकासाचा दृष्टिकोन आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे सूक्ष्म नियोजन ही दोन मुख्य कारणे ठरली आहेत. राज्यातील जनतेने फडणवीस यांच्या विकसित महाराष्ट्राच्या संकल्पनेला आणि चव्हाण यांच्या विचारधारेला दिलेल्या सादामुळेच भाजपला हे अभूतपूर्व यश संपादन करता आले आहे.

विजयाचे दोन मुख्य आधारस्तंभ

या निवडणुकीच्या निकालांनी हे स्पष्ट केले आहे की, शहरी मतदारांची नस ओळखण्यात रविंद्र चव्हाण यशस्वी झाले आहेत. मागील वर्षी जानेवारीमध्ये त्यांनी प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यात 1.5 कोटी प्राथमिक सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण केले होते. पक्षसंघटना मजबूत करण्याच्या त्यांच्या याच प्रयत्नांमुळे भाजपला मैदानात उतरण्यापूर्वीच मोठी ताकद मिळाली होती. निवडणुकांचे नियोजन, तिकीट वाटप आणि विरोधकांच्या रणनीतीला शह देण्याचे कसब देवेंद्र फडणवीस आणि रविंद्र चव्हाण या जोडीने प्रभावीपणे हाताळले.


( नक्की वाचा : Amravati Result : अमरावतीमध्ये चुरस वाढली, कोणत्याच पक्षाला बहुमत नाही, वाचा सर्व विजयी उमेदवारांची यादी )

चव्हाण यांनी दिलं उत्तर

रविंद्र चव्हाण यांच्या रूपाने भाजपला रस्त्यावर उतरून काम करणारा आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणारा नेता मिळाला आहे. निवडणूक काळात विरोधकांकडून त्यांच्यावर वैयक्तिक टीका करण्यात आली, त्यांच्या पेहरावावरून आणि वक्तव्यावरून निशाणा साधण्यात आला. मात्र, या टीकेने विचलित न होता चव्हाण यांनी आपले पूर्ण लक्ष विजयावर केंद्रित केले. विरोधकांना अनावश्यक वादात गुंतवून ठेवून त्यांनी भाजपचा मार्ग सोपा केला. त्यांच्या 25 वर्षांच्या राजकीय प्रवासात त्यांनी प्रत्येक टीकेला आपल्या कार्यातून उत्तर दिले आहे, हे या विजयाने पुन्हा एकदा सिद्ध झाले.

सरकार आणि संघटना यांचा समन्वय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविंद्र चव्हाण यांच्या कार्यशैलीची पूर्ण कल्पना आहे. पक्षासाठी 24 तास समर्पित राहणारा अध्यक्ष म्हणून चव्हाण यांचे महत्त्व फडणवीस जाणून आहेत. चव्हाण यांची कायम निवडणूक सिद्ध राहण्याची पद्धत आणि अडीच वर्षे सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून काम करताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढल्याचा फायदा पक्षाला झाला. या काळात त्यांनी जो संपर्क निर्माण केला आणि जी माणसे जोडली, ती भाजपसाठी विजयाची शिडी ठरली आहेत.

सुक्ष्म नियोजनाचा फायदा

राजकीय विश्लेषकांच्या मते, हा विजय म्हणजे सरकार आणि भाजप प्रदेश संघटना यांच्यातील उत्तम समन्वयाचे फळ आहे. देवेंद्र फडणवीस यांचे अष्टपैलू नेतृत्व आणि रविंद्र चव्हाण यांचा नियोजनाचा प्रचंड आवाका यामुळेच भाजपला हे यश मिळाले आहे. या विजयाची संपूर्ण आकडेवारी जेव्हा समोर येईल, तेव्हा चव्हाण यांनी आखलेल्या रणनीतीची व्याप्ती अधिक स्पष्टपणे महाराष्ट्राच्या लक्षात येईल. महाराष्ट्राच्या राजकारणात एक मुरब्बी राजकारणी म्हणून रविंद्र चव्हाण यांचा उदय या निमित्ताने झाला आहे.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com