
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. पण या हल्ल्यानंतर तिथल्या स्थानिकांनी पर्यटकांना वाचवण्यासाठी जिवाची बाजी लावली. त्या पैकीच एक होते सजाद भट्ट. त्यांचा एक व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. एका मुलाला पाठिवर घेवून ते डोंगरावरून खाली उतरताना दिसत आहेत. त्याने त्या मुलाला सुरक्षित पणे खाली आणले. त्यानंतर त्याला रुग्णालयातही दाखल केले. त्यामुळे त्या मुलाचे जीवही वाचले. व्हायरल झालेल्या या व्हिडीओतील तरुण हा मुळचा पहलगामचा रहिवासी आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सजाद भट्ट याने त्या दिवशीचा थरार आपल्या शब्दात त्याने सांगितला आहे. ज्यावेळी पहलगामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यावेळी आपण घरी होतो. घरातल्या एका व्यक्तीचे निधन झाले होते. त्यामुळे घरात अन्य नातेवाईकही आले होते. त्याच वेळी आमच्या असोसिएशनच्या अध्यक्षांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की बैसरनमध्ये काही तरी दुर्घटना घडली आहे. आपल्याला तिथे मदतीसाठी जावं लागणार आहे. सर्व घोडेवाल्यांना आदेश देण्यात आले.सर्वांनी घोडे घेवून तातडीने पर्यटकांची मदत करावी. सर्व जण बैसरन इथं पोहोचले. असं त्याने सांगितलं.
तिथं काही लोक आधीच मदत करत होते. त्यावेळी तिथे अनेक जण जखमी होते. आम्ही त्यांना पाणी दिलं. त्यांना धीर दिला. घाबरू नका आम्ही तुमच्या मदतीसाठी आलो आहे असं सांगितलं. आम्ही तुमच्या भावांसारखे आहोत, काळजी करू नका. आम्ही तुमच्या बरोबर आहोत असं सर्वांना सांगितलं असं साजिद सांगतो. त्यानंतर तिथं असलेल्या एका लहान मुलाने अंकल अंकल मुझे बचा लो अशी विनंती केली. त्यावेळी आपण त्याला खांद्यावर घेवून दवाखान्यात पोहोचवलं. त्याला ही धिर दिला. असं सजाद सांगतो. त्यावेळची स्थिती अतिशय तणावपूर्ण होती. पण त्याचा जिव वाचवणं महत्वाचं होतं असं ही तो म्हणाला.
दहशतवाद्यांनी चुकीची गोष्टी केली. त्यांनी मानवतेचाच खून केला आहे. त्या ऐवजी त्यांनी आम्हालाच मारलं असतं तर बरं झालं असतं असं ही सजाद सांगतो. काश्मीरच्या प्रत्येक घरात शोक व्यक्त केला जात आहे. सगळी दुकानं बंद आहेत. सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. दहशतवाद्यांनी आमच्या ही एका सहकाऱ्याला गोळ्या घातल्या. आम्ही जास्तीत जास्त लोकांचा जीव वाचवला. त्यांना दवाखान्यात नेलं. या हल्ल्यानंतर काश्मीरच्या प्रत्येक घरात शोक आहे. या घटनेमुळे आमचा रोजगार पुर्ण पणे बुडाला आहे असं सजाद सांगतो.
दरम्यान या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर राजकीय दबाव वाढवला आहे. सिंधु पाणी वाटप करार स्थगित करण्यात आला. पाकिस्तानी नागरिकांना भारतीय व्हिसा देण्यात येणार नाही. जे पाकिस्तानी नागरिक भारतात आहेत त्यांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पाकिस्तानी दुतावासातील अधिकाऱ्यांनाही भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारतातील पाकिस्तानी उच्चायोग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच बरोबर अटारी वाघा बॉर्डर ही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 1 मे पर्यंत ही बॉर्डर बंद राहील.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world