
Maharashtra Vidhansabha Election Result 2024: राज्याच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर होत आहे. विधानसभेचा निकाल जाहीर होण्याआधीच महायुती तसेच महाविकास आघाडीकडून सत्ता स्थापनेचा दावा करण्यात येत आहे. तसेच दोन्ही बाजूंनी अपक्षांची पळवापळव अन् बंडखोरांच्या जुळवाजुळवीचे प्रयत्न सुरु आहेत. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. त्यामुळे महायुती महाविकास आघाडीसह प्रत्येक घटकपक्ष किंगमेकर ठरण्यासाठी चाली खेळणार आहे. त्यामुळेच राज्याच्या राजकारणात अभूतपुर्व अशा घडामोडी पाहायला मिळणार आहेत. काय असतील सत्ता स्थापनेच्या पाच महत्वाच्या शक्यता वाचा सविस्तर...
1. स्पष्ट बहुमत..
राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत आहे. एकीकडे महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे. राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी महायुती किंवा महाविकास आघाडीपैकी कोणत्याही एका बाजूने स्पष्ट बहुमत दिल्यास फोडाफोडी अन् जुळवाजुळवीचे राजकारण करावे लागणार नाही. त्यामुळे स्पष्ट बहुमत मिळालेले पक्ष सत्तेवर येतील आणि मुख्यमंत्रीपदाचा निर्णयही होईल.
2. अजित पवार किंगमेकर:
सत्ता स्थापनेची दुसरी एक शक्यता म्हणजे अजित पवार यांची भूमिका. निवडणुकीच्या निकालानुसार भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट बहुमतापासून दूर असेल आणि अजित पवार यांची गरज लागणार असेल तर अजित पवार यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. अशावेळी अजित पवार यांना महाविकास आघाडीकडूनही साद घालण्याचा प्रयत्न होईल. मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवार यांनी भाजपला साथ दिली असल्याचे ते सांगतात. मात्र त्यांचे हे स्वप्न अद्याप पुर्ण झालेली नाही. अशावेळी मविआकडून त्यांना तशी ऑफर मिळाल्यासही दादा ऐनवेळी भूमिका बदलण्याचीही शक्यता आहे.
नक्की वाचा: पुन्हा 23 नोव्हेंबर! संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडवणारा दिवस; 5 वर्षांपूर्वी काय घडलेलं?
3. उद्धव ठाकरेंची भाजपला साथ
2019 मध्ये मुख्यमंत्रीपदावरुन वाजल्यानंतर उद्धव ठाकरेंनी काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली होती. त्यामुळेच मविआची सत्ता आली, आता भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या अन् पुन्हा एकदा ठाकरे किंगमेकरच्या भूमिकेत राहिले तर ते पुन्हा भाजपला साथ देऊ शकतात. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनीही तसे संकेत दिले होते. उद्धव ठाकरे परत येतील का? या प्रश्नावर राजकारणात काहीही होऊ शकते,असे फडणवीस म्हणाले होते.
4. अपक्ष, छोटे पक्ष अन् बंडखोरांचा कौल
आतापर्यंत महाराष्ट्रात युतीच्या राजकारणाचा बोलबाला होता. अपक्ष किंवा छोटे पक्ष हा घटक कधीच नव्हता, पण यावेळी ज्या प्रकारे एक्झिट पोल समोर आले आहेत, त्यावरुन अपक्ष, बंडखोर आणि छोटे पक्ष किंगमेकरची भूमिका बजावतील, अशी शक्यता आहे. त्यामुळेच मविआ, महायुतीकडून अपक्षांशी संपर्क साधला जात आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी सरकारमध्ये सामील होण्याबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महत्वाची बातमी: आघाडी की युती? प्रतीक्षा संपणार! दोन्ही बाजूंनी सत्तेसाठी मोर्चेबांधणी
5. शरद पवार डाव टाकणार
राज्यात निकालानंतर सत्ता स्थापनेपर्यंत सर्वात महत्वाची भूमिका राहणार आहे ती ज्येष्ठ नेते शरद पवार यांची. राष्ट्रवादीच्या फुटीपासून
शरद पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तेपासून ठेवण्यासाठी दंड थोपटले आहेत. त्यामुळे निकालानंतर शरद पवार यांच्या खेळीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल. 2019 मध्येही भाजपच्या हातातील सत्ता हिसकावून घेण्यात शरद पवार यांची भूमिका महत्वाची ठरली होती.
त्यामुळे आता पुन्हा शरद पवार कोणती खेळी करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याआधी 2014 मध्ये भाजपला पाठिंबा देऊन पवारांनी सर्वांनाच चकित केले होते. अशावेळी या निकालानंतरी शरद पवार आपल्या निर्णयाने मोठा धक्का देऊ शकतात.
निकालाआधी हे वाचा: हॉटेल, चॉपर, चार्टर्ड प्लेन... निकालाच्या आधी सर्वच पक्षांची कशी आहे तयारी?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world