
देवीदास राखुंडे
भाजपाचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे भाजपमध्येही नाराज आहेत की काय अशी चर्चा सध्या इंदापुरात सुरू झाली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या उपक्रमांची माहिती देण्यासाठी सोशल मीडिया पोस्ट तयार करण्यात येतात. विधानसभा निवडणुका जवळ आल्या असून हर्षवर्धन पाटील यांनी यंदाही या निवडणुकांची तयारी करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत पाटील यांना अजित पवारांचे खास मर्जीतले असलेल्या दत्तात्रय भरणे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. महायुतीमध्ये भरणे हे अजित पवारांसोबत असून त्यांच्यामुळे हा मतदारसंघ भाजपला सुटण्याची शक्यता जवळपास मावळली आहे.या पार्श्वभूमीवर पाटील यांची पोस्ट त्यांचा मुलगा राजवर्धन यांनी शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ना भाजपचे कमळ चिन्ह आहे ना भाजपच्या नेत्यांची छबी. पोस्टमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा एकट्याचाच फोटो असून ते, '18 जुलै रोजी सकाळी 8 वाजता सर्वसामान्यांना भेटण्यासाठी उपस्थित असतील असे म्हटले आहे.'
ट्रेंडींग बातमी - 'बघून येतो...' बोलून गेलेले भुजबळ वर्षभराने शरद पवारांच्या भेटीला
चौकशी नाही, शांत झोप लागते!
हे तेच हर्षवर्धन पाटील आहेत ज्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर 'भाजपमध्ये मी मस्त अन् निवांत आहे, मला शांत झोप लागते. माझी कोणती चौकशी ही सुरू नाही' असे विधान केले होते. कालपर्यंत शांत झोप लागणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांची तिकीट मिळण्याची शक्यता मावळताना दिसू लागल्याने झोप उडाली असावी आणि त्यामुळे त्यांच्या पोस्टमधून कमळ चिन्ह गायब झाले असावे अशी कुजबूज इंदापुरात सुरू आहे.

ट्रेंडींग बातमी - पक्षश्रेंष्ठींनी कारवाई केली नाही म्हणून डेअरिंग वाढली', काँग्रेस आमदारानं सांगितलं गद्दारांचं सत्य
राज्यसभेसाठीही उमेदवारी नाकारली
राज्यसभेसाठीच्या निवडणुकीसाठीही हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती. काँग्रेसची सत्ता असताना हर्षवर्धन पाटील यांनी स्वत:चं एक स्थान निर्माण केलं होतं. भाजपमध्ये आल्यानंतर पाटील यांना अडगळीत टाकलंय की काय असं त्यांच्या समर्थकांना वाटू लागलं होतं. हर्षवर्धन नाराज होऊ नये यासाठी त्यांना राष्ट्रीय सहकार साखर संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून आणण्यात आलं होतं. लोकसभा आणि नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकांनंतर मोठी कसोटी ही विधानसभा निवडणुकीची असणार आहे. हर्षवर्धन पाटील यांनी ही संधी हातची जाऊ द्यायची नाही असा निर्धार केला असावा ज्यामुळे त्यांनी गरज पडल्यास अपक्षही लढण्याची त्यांनी तयारी केली असावी ज्यामुळे त्यांच्या पोस्टमधून कमळ चिन्ह गायब झाले असावे असा तर्क लावला जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world