
साजन ढाबे, वाशीम
Washim News: समृद्धी महामार्गावर आतापर्यंतची सर्वात मोठी चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या भिवंडीहून नागपूर आणि रायपूर मार्गे कोलकत्याकडे निघालेल्या एका ट्रकमधून तब्बल 2 कोटी 43 लाख 86 हजार 684 रुपये किमतीचे 46 व्हॅक्सिनचे बॉक्स चोरीला गेले आहेत. ही घटना वाशिम जिल्ह्यातील कारंजा जवळ उघडकीस आली असून, पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे.
काय घडले नेमके?
महेश कार्गो मूव्हर्स ट्रान्सपोर्टचा एक वातानुकूलित ट्रक भिवंडी येथून रुग्णालयांसाठी महत्त्वाच्या व्हॅक्सिनचे बॉक्स घेऊन निघाला होता. या ट्रकमध्ये एकूण 408 व्हॅक्सिनचे बॉक्स त्यात होते. भिवंडीवरून निघाल्यानंतर ट्रकने बुलढाणा जिल्ह्यातील डोनगाव येथे डिझेल भरले. डिझेल भरून ट्रक पुन्हा आपल्या मार्गावर निघाला.
(नक्की वाचा : Pune Rave Party : 'माल पाहिजे का'? पोलिसांच्या तपासात खडसेंच्या जावयाबाबत अनेक धक्कादायक गोष्टी उघड )
चोरी कशी उघडकीस आली?
वाशिम जिल्ह्यातील कारंजाजवळ पोहोचत असताना, ट्रकच्या मागील भागातील तापमानात वाढ झाल्याचे ड्रायव्हरच्या लक्षात आले. त्यामुळे त्याने गाडीचा वेग कमी केला. त्याचवेळी त्याने साईड ग्लासमध्ये पाहिले असता, ट्रकमधून तीन व्यक्ती उड्या मारून पळताना दिसल्या. हे पाहून ड्रायव्हरने लगेचच गाडी थांबवली आणि 112 या हेल्पलाइन क्रमांकावर पोलिसांना फोन करून संपूर्ण घटनेची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ट्रक कारंजा येथील ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये आणून त्याची तपासणी करण्यात आली. या तपासणीत एकूण 408 बॉक्सपैकी 46 व्हॅक्सिनचे बॉक्स चोरीला गेल्याचे उघड झाले. चोरीला गेलेल्या व्हॅक्सिनची किंमत खूप मोठी असल्याने पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे.
(नक्की वाचा- 'अरे पिसाळलेल्या XX', 'वंचित' कडून जितेंद्र आव्हाडांना आर्वाच्च भाषेत शिवीगाळ का? वाचा Inside Story)
या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. मात्र समृद्धी महामार्गावरील या चोरीच्या घटनेने महामार्गाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world