नागपूर विद्यापीठाच्या मुलींच्या कराटे संघासोबत धावत्या रेल्वेत गैरवर्तन केल्याप्रकरणी आरपीएनं कारवाई केलीए...ओडिशातील बालासोरमध्ये राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा मुलींचा कराटे संघ रवाना झाला होता. रविवारी सकाळी 'फलकनुमा एक्स्प्रेस'मध्ये १०-१२ मुलींच्या संघासोबत एक महिला आणि एक पुरुष प्रशिक्षक होते. मात्र दोन्ही प्रशिक्षक वेगळ्या बोगीत बसले असल्याने आणि मुली रेल्वेच्या वेगवेगळ्या डब्यांमध्ये विखुरलेल्या असल्याने छेडछाडीचा प्रकार घडला. काही उनाड तरुणांच्या एका गटाने मुलींची छेड काढली. या तरुणांनी मुलींवर अश्लाघ्य शेरेबाजी केली. छेडछाड सुरू असताना घाबरलेल्या काही मुलींनी आपल्या पालकांशी संपर्क साधला आणि या प्रसंगाचे व्हिडिओ चित्रीकरण करून आपल्या कुटुंबाला पाठवले. रेल्वे सुरक्षा दलाला या प्रकरणाची माहिती फोनवरून देण्यात आली, परंतु ते त्वरित पोहोचले नाहीत असा आरोप पालकांनी केला आहे. अखेर पुढील स्थानकावर रेल्वे पोलिसांनी या उनाड तरुणांना ताब्यात घेतले आणि त्यांच्यावर कारवाई केलीए