वाशिमच्या मानोरा तालुक्यात आज दुपारी अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे बाजार समितीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अनेक शेतकरी आपलं तूर पीक विक्रीसाठी घेऊन आले होते. मात्र पावसामुळे हमी भावानं विक्री पूर्वीच तुरीवर पाणी पडल्यानं मोठ्या प्रमाणात तूर खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बाजार समितीच्या आवारात पावसापासून संरक्षणासाठी योग्य व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना आपल्या तुरीच्या गोण्यांवर प्लास्टिक टाकून वाचवण्याचा प्रयत्न करावा लागला.