जाहिरात

'जातीपातीचे संदर्भ येतात तेव्हा भीती वाटते', राज ठाकरेंचं विठूरायाच्या चरणी साकडं

राज ठाकरेंनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या जातीपातीच्या राजकारणावर बोट ठेवलं.

'जातीपातीचे संदर्भ येतात तेव्हा भीती वाटते', राज ठाकरेंचं विठूरायाच्या चरणी साकडं
मुंबई:

आज आषाढी एकादशीला पंढरपुरात (Ashadhi Ekadashi Pandharpur) भक्तिमय वातावरणात विठूरायाची महापूजा करण्यात आली. महिनाभरापासून माऊलच्या दर्शनासाठी व्याकूळलेल्या वारकऱ्यांनी आज डोळेभरून विठूमाऊलीचं दर्शन घेतलं. यानिमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (MNS President Raj Thackeray social media post) सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्रात सुरू असलेल्या जातीपातीच्या राजकारणावर बोट ठेवलं आणि हे विष समूळ नष्ट करण्यासाठी विठ्ठलाच्या चरणी साकडं घातलं. 

राज ठाकरेंची पोस्ट...
आषाढी एकादशीच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. गेली 8 शतकं विठ्ठलाच्या ओढीने पंढपुराला लाखो भक्त न चुकता प्रस्थान करतात. माझ्या मते जगातील अशी एकमेव आणि इतकी दीर्घ परंपरा असेल. म्हणजे आपल्या परंपरेत वारीसारखं काही नाही, असं नाही. 'यात्रा' ही आपल्या हिंदू परंपरेचा अविभाज्य भाग. पण चारधाम यात्रा असो की काशीची यात्रा असू दे, त्या सगळ्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावरच्या. त्या देखील एकदाच घडतात. पण वारीचं असं नाही. विठ्ठलाच्या ओढीने दरवर्षी, नेमाने, पायी, शेकडो मैल प्रवास करावयाचा, उन्हात, पावसा-पाण्यात, पडतील त्या हालअपेष्टा सोसत. वारकरी आपल्या गावातील दिंडीसोबत निघतात. निघताना आपल्यासोबत संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि अनेक संतांचा सहवास आहे ही श्रद्धा मनात घेऊन निघायचं. समोर जे येईल ते स्वीकारत पुढे जायचं आणि विठ्ठलाकडे काहीही न मागता, जे वर्षभर घडणार आहे ती विठ्ठलाची इच्छा आहे असं मानण्याची आणि स्वीकारण्याची शक्ती घेऊन परत यायचं. 

देवालाच भक्त भेटीची ओढ असणारा हा देव असल्यामुळे गेली अनेक शतके महाराष्ट्रातील तळागाळातील आणि सर्व जातीतील लोकांना आपलासा वाटणारा हा देव. पंढरपुरात विठ्ठलाच्या पायाशी आल्यावर जिथे माणसाचं मी पण गळून पडते तिथे जातीचं भान तरी काय आणि कसं टिकणार. त्यामुळे खरंच महाराष्ट्रावर विठ्ठलाची कृपा आहे असं मी नेहमी मानतो. 

नक्की वाचा - Live Update : आषाढी एकादशीनिमित्ताने देशभरात विविध कार्यक्रमांची मांदियाळी

पण दुर्दैवाने गेलं एक ते दीड दशक महाराष्ट्रात जातीपातीचे विष इतकं खोलवर रुजत चालले आहे की हाच तो का महाराष्ट्र असा प्रश्न पडतो. जेंव्हा अगदी 7, 8 वर्षाच्या मुलामुलींच्या बोलण्यात जातीपातीचे संदर्भ येतात तेंव्हा मात्र भीती वाटते. मुघलांच्या आक्रमणात सुद्धा टिकलेला, सत्व न गमावलेला मराठी समाज, पुढे फोडा आणि राज्य करा या ब्रिटिशांच्या नीतीला पण पुरून उरलेला मराठी समाज आणि स्वातंत्र्यानंतर 'महा'राष्ट्र उभं करण्याच्या जिद्दीने उभा राहिलेला समाज, अचानक सत्ता आणि पैसा हेच स्वप्न उराशी बळगणाऱ्या मूठभरांच्या नादी लागून इतका कसा विस्कटत चालला आहे हेच कळत नाही. म्हणूनच आजच्या दिवशी विठ्ठलाच्या चरणी माझी हात जोडून प्रार्थना आहे, महाराष्ट्रात पसरत चाललेलं हे जातीपातीचे विष समूळ नष्ट कर. आणि पुन्हा एकदा हिमालयाच्या रक्षणाला धावणारा एकसंध सह्याद्री दिसू दे. पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आषाढी एकादशीच्या शुभेच्छा !


 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
Walk : अतिरिक्त चरबी अन् आजारांना म्हणा बाय बाय, 30 दिवसांचा प्रभावी Walking Plan!
'जातीपातीचे संदर्भ येतात तेव्हा भीती वाटते', राज ठाकरेंचं विठूरायाच्या चरणी साकडं
CIDCO Navi mumbai  Lottery CIDCO New Lottery Announcement, Why Buy a CIDCO Home
Next Article
सिडकोचेच घर का खरेदी कराल? नव्या लॉटरीत 'ही' आहे खास गोष्ट