महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आज बारामतीतून लोकसभेसाठी उमेदवारी दाखल करणार आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी अजित पवार आणि सुनेत्रा पवारांनी पुण्यातील श्रीमंत दगडूसेठ हलवाई मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. अजित पवारांनी दगडूशेठ मंदिरात आरतीदेखील केली. दोघंही दगडूशेठ चरणी नतमस्तक झाले. यावेळी मंदिरात महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात ही लढत होणार आहे.
मोठं शक्ती प्रदर्शन करत सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहे. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, मोदींनी तिसऱ्यांना पंतप्रधान बनावं यासाठी आपले उमेदवार निवडून येणं महत्वाचं आहे, त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तर, मी नक्की निवडून येणार, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
बारामती मतदारसंघ हा 57 वर्षांपासून पवार घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. 1967 मध्ये शरद पवार पहिल्यांदा बारामतीतून विधानसभा निवडणूक जिंकले. 1972, 1978, 1980, 1985 आणि 1990 मध्ये त्यांनी येथून सातत्याने विधानसभा निवडणुका जिंकल्या आहेत.
शरद पवार बारामतीतून 1991, 1996, 1998 आणि 2004 मध्ये सलग खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी ही जागा 2009 मध्ये त्यांची मुलगी सुप्रिया सुळेला दिली. सुप्रिया सुळे 2009, 2014 आणि 2019 मध्ये येथून विजयी झाल्या होत्या. सुनेत्रा पवार पहिल्यांदाच बारामतीमधून निवडणूक लढवत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world