जाहिरात

मोदींच्या सभेआधीच शिंदेंना दणका, थेट कल्याण जिल्हाप्रमुखानेच दिला राजीनामा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे या मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याच प्रचारासाठी मोदी जाहीर सभा घेत आहेत. मात्र सभेला काही तास शिल्लक असतानाच शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

मोदींच्या सभेआधीच शिंदेंना दणका, थेट कल्याण जिल्हाप्रमुखानेच दिला राजीनामा
कल्याण:

अमजद खान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा आज ( बुधवारी ) कल्याण इथं होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे हे या मतदार संघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याच प्रचारासाठी मोदी जाहीर सभा घेत आहेत. मात्र सभेला काही तास शिल्लक असतानाच शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. कल्याण मुरबाडचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पदाला सन्मान नाही तर पद कशाला? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी राजीनामा दिला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अरविंद मोरे हे शिंदे गटाते कल्याण मुरबाडचे जिल्हा प्रमुख होते. त्यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेत महत्वाची पदे भूषवली आहेत. शिवसेनेत फुट पडल्यानंतर त्यांनी ठाकरें ऐवजी शिंदेंना साथ दिली. शिंदे गटात आपल्याला योग्य मान सन्मान मिळेल अशी त्यांची भावना होती. मात्र ती फोल ठरल्याचे आता समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा कल्याणमध्ये होत आहे. अशा वेळी या सभेतून अरविंद मोरे यांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे मोरे नाराज झालेत. आपल्या हाताखाली काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना मोदींच्या स्टेजवर स्थान दिले जाते. शिवसेने प्रॉटोकॉल नुसार जिल्हाप्रमुख हे पद महत्वाचे आहे. आनंद दिघेंनी या पदाला एक वेगळी उंची दिली होती. मात्र त्याच पदाचा आता सन्मान राखला जात नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 

हेही वाचा - PM मोदींच्या मुंबई दौऱ्यानिमित्त घाटकोपरमधील हे मार्ग राहणार बंद; पर्यायी मार्ग कोणते? 

जिल्हाप्रमुख पदालाचा योग्य सन्मान राखला जात नसेल. त्याला योग्य सन्मान मिळत नसेल तर पदावर राहून काय उपयोग असा प्रश्न त्यांनी केला आहे. त्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राजीनामा आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवला असल्याचेही त्यांनी सांगितले. अरविंद मोरे यांच्या राजीनाम्यानंतर कल्याण डोंबिवलीत राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता पक्षाकडून काय पावले उचलली जातात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे मोरे यांनी बोट दाखवले आहे. मोदींची सभा होत असली तरी स्थानिक शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमधील वाद कमी होण्याचे चिन्ह नाहीत.