जाहिरात
This Article is From Apr 17, 2024

'पक्ष फोडला, जेलमध्ये टाकले, अन्याय, अवहेलना केली त्यांचा प्रचार करायचा का?'

'पक्ष फोडला, जेलमध्ये टाकले, अन्याय, अवहेलना केली त्यांचा प्रचार करायचा का?'
रत्नागिरी:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्याचे पडसाद पक्षात उमटले. अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त करत ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे. राज यांच्या या भूमिकेमुळे कोकणातील एक मोठा नेता आता नाराज झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मनसेमध्ये सध्या या निर्णयामुळे धुसफूस वाढतेय हे स्पष्ट होत आहे. कोकणात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मनसैनिकांनी जाहीर नाराजी व्यक्त करत आपली भावना राज ठाकरेंपर्यंत पोहोचवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे कोकणात मनसे महायुतीच्या उमेदवाराता प्रचार 'मनसे' करणार की नाही याची चर्चा सुरू झाली आहे. 

खेडचे वैभव खेडेकर नाराज? 
राज यांनी महायुतीला पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवाण्यात आली होती. या बैठकीत मनसैनिकांनी तिव्र प्रतिक्रीया व्यक्त केला. याबाबत माहिती देताना खेडेकर यांनी मनसैनिकांच्या भावना या तिव्र असल्याचे सांगितले. मनसेची गेल्या वीस वर्षाची वाटचालही संघर्षमय झाली आहे. मनसेला संपवण्यासाठी ज्या लोकांनी कोकणात प्रयत्न केला त्यांचा प्रचार आता आम्ही करायचा का? असा प्रश्न खेडेकरांनी केला. याच लोकांनी मनसेच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले, त्यांना जेलमध्ये टाकले, त्यांना राजकीय जिवनातून उठवण्याचा प्रयत्न झाला त्यांच्यासाठीच आता मतं मागायची का असेही ते म्हणाले. मनसेचे नगरसेवक फोडले, अन्याय केला, अवहेलना केली त्यांचा प्रचार करण्यासाठी मनसैनिकांची एक प्रकारे तयारी नसल्याचेच अप्रत्यक्ष पणे खेडेकर म्हणाले. त्यांच्या भावना या तिव्र आहे. त्या लगेचच सौम्य होणे शक्य नाही. या भावना आपण राज ठाकरें पर्यंत पोहोचवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

हेही वाचा - माढ्यात चक्र फिरली, उत्तम जानकर फोकसमध्ये, मोठा निर्णय घेणार?

युतीच्या उमेदवाराबाबतही नाराजी   
रायगड रत्नागिरी मतदार संघाचे युतीचे उमेदवार सुनिल तटकरे यांच्याबाबतही मनसैनिकांनी नाराजी व्यक्त केली. तटकरे यांनी गेल्या पाच वर्षात काहीच काम केले नाही. त्यांनी मतदार संघासाठी निधी दिला नाही. निधी बाबत कधी विचारणाही केली नाही. त्यांचा प्रचार कसा करायचा असाही प्रश्न आहेच असेही त्यांनी स्पष्ट केले. मनसेच्या या भूमिकेमुळे मनसैनिक महायुतीचे बिनशर्त काम कसे करणार याचीही आता चर्चा होऊ लागली आहे. 

हेही वाचा - मतदानापूर्वी मोठी कारवाई! छत्तीसगडमध्ये टॉप कमांडरसह 29 नक्षलवाद्यांचा खात्मा

सत्तेच्या वाट्याचे काय?          
मनसेचे कोकणात याच लोकांनी मोठ्या प्रमाणात खच्चीकरण केले आहे असा आरोपही खेडेकर यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थामधील सत्तेतील वाट्य़ाबाबत काय असाही त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. शिवाय आमच्यावर जे खोटे गंभीर गुन्हे दाखल केले आहेत त्याचे काय होणार हा ही प्रश्न अनुत्तरीत असल्याचे खेडेकर म्हणाले. या सर्वांची चर्चा राज ठाकरे यांच्याबरोबर करून त्यानंतर पुढील निर्णय घेऊ असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान काही झाले तरी राज ठाकरे यांचा जो आदेश असेल त्यानुसारचं पुढची वाटचाल केली जाईल हे सांगायला खेडेकर विसरले नाहीत. पण एक गोष्ट नक्की आहे. की नेत्यांनी जरी निर्णय घेतला असला तरी खाली कार्यकर्ते मात्र नाराज आहेत. त्यांची ही नाराजी काही लपून राहीलेली नाही. त्यामुळे भविष्यात आता कोकणात काय होतं ते पहावं लागेल.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com