देशात सध्या लोकसभा निवडणुक प्रचाराचा धुरळा उडालेला आहे. प्रत्येक पक्ष यामध्ये आपापला प्रचार करताना दिस आहे. महाराष्ट्रात महायुती-महाविकास आघाडी आणि वंचित असा तिरंगी सामना होणार आहे. महाविकास आघाडीसोबत जाता-जाता राहिलेल्या प्रकाश आंबेडकरांनी पुन्हा आपली वेगळी वाट पकडली आहे. गडचिरोली येथील सभेत बोलत असताना आज प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघातील टीका केली आहे.
गल्लीतल्या दादाप्रमाणे पंतप्रधान मोदी वसुली करतात. काँग्रेस आणि भाजपमध्ये मॅचफिक्सींग झाल्याचं विधानही यावेळी प्रकाश आंबेडकरांनी केलं. गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदारसंघाचे वंचितचे उमेदवार हितेश मडावी यांच्या प्रचारासाठी आंबेडकर गडचिरोलीत होते.
नरेंद्र मोदी हे गल्लीतल्या दादासारखे वसुली करतात –
प्रत्येक गल्लीत जसा दादा वसुली करत असतो तसंच पंतप्रधान मोदी खुर्चीवर बसून वसुली करतात. असा गल्लीतला दादा जर पंतप्रधानपदासाठी उभा राहिला तर त्याला सामान्य नागरिक निवडून देतील का? गादीवर बसून देशाची लूट करणाऱ्या तुम्ही मतदान करणार का? असा प्रश्न यावेळी आंबेडकरांनी विचारला.
अवश्य वाचा - अजितदादांच्या 'पवार कार्ड'वर शरद पवारांची नवी खेळी! म्हणाले....
महाविकास आघाडीलाही आंबेडकरांनी केलं लक्ष्य –
हेच प्रश्न काँग्रेसने मोदींना विचारायला हवे होते. उद्धव ठाकरे, शरद पवारांनी विचारायला हवे होते. परंतु उद्धव ठाकरे, शरद पवार हे दोघंही असे प्रश्न विचारु शकणार नाहीत. कारण त्यांच्यामागे ईडीचा भोंगा लावला आहे. आजच बातमी आली आहे की राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या मालमत्ता जप्त करण्याची नोटीस आली आहे. या नोटीसीमुळे ते गप्प नाहीत ना? असा सवाल आंबेडकरांनी विचारला.
यापुढे बोलत असताना प्रकाश आंबेडकरांनी नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर बसायच्या लायकीचे नसल्याचं सांगितलं. तसेच काँग्रेस आणि भाजपमध्ये मॅचफिक्सींग झाल्याचा आरोपही त्यांनी केला. यातून देशाला आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी मी मैदानात उतरल्याचं आंबेडकर म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world