जाहिरात

हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी वाढली? दत्ता भरणेंना पाठिंबा देणारे आप्पासाहेब जगदाळे कोण?

हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी दिल्याने शरद पवारांकडचे नेते अजित पवारांकडे जात आहेत. त्या पैकीच एक आहेत आप्पासाहेब जगदाळे.

हर्षवर्धन पाटलांची डोकेदुखी वाढली? दत्ता भरणेंना पाठिंबा देणारे आप्पासाहेब जगदाळे कोण?
पुणे:

देवा राखुंडे 

इंदापूर विधानसभा मतदार संघ हा विधानसभा निवडणुकीच्या सुरूवातीपासूनच चर्चेत राहीला आहे. या मतदार संघात झालेल्या घडामोडींनी संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले होते. भाजपचे असलेले हर्षवर्धन पाटील हे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तर पाटील यांना उमेदवारी दिल्याने शरद पवारांकडचे नेते अजित पवारांकडे जात आहेत. त्या पैकीच एक आहेत आप्पासाहेब जगदाळे. त्यांच्या पक्ष प्रवेशाने इंदापूरमध्ये दत्ता भरणे यांना बळ मिळणार आहे.तर हर्षवर्धन पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे. निवडणूक ऐन रंगात आल्यानंतर आप्पासाहेब जगदाळे यांनी अजित पवारांना साथ देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे आप्पासाहेब जगदाळे कोण, ज्यांच्यामुळे निवडणुकीचा निकाल फिरू शकतो अशी चर्चा सुरू झाली आहे.  

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

जगदाळेंनी शरद पवारांची साथ सोडली 

आप्पासाहेब जगदाळे हे पुणे जिल्हा बँकेचे संचालक आहेत. त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केल्याने,  इंदापूर तालुक्यात पक्षाची ताकद वाढणार आहे.  माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी दिल्यानंतर नाराज असलेले जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी इंदापूर तालुक्यातील निमगांव केतकी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बुधवार पक्षप्रवेश केला. याच वेळी दत्तात्रय भरणे यांच्यासाठी घरोघरी प्रचार करून भरणे यांना 35 हजाराच्या मताधिक्क्याने  विजयी करणार असल्याचा दावा  जगदाळे यांनी केला.

ट्रेंडिंग बातमी - मधूरिमा राजेंनी उमेदवारी मागे का घेतली? सतेज पाटील पहिल्यांदा बोलले, पण थेट बोलले

कोण आहेत आप्पासाहेब जगदाळे ? 

आप्पासाहेब जगदाळे पुणे जिल्हा बँकेचे मागील वीस वर्षापासून संचालक आहेत. आप्पासाहेब हे हर्षवर्धन पाटील यांचे नात्याने चुलत मामा आहे. त्यांनी  1995 च्या पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीपासून त्यांची साथ दिली होती. मागील 2019 च्या निवडणुकीतही ते त्यांच्याबरोबर होते. ते इंदापूर तालुक्यातील राजकारणातील बडेप्रस्थ म्हणून ओळखले जाता.  जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आहेत. शिवाय विद्यमान संचालक ही आहेत. त्याचबरोबर त्यांच्या ताब्यात इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, इंदापूर तालुका खरेदी विक्री संघ, तालुक्यातील सहकारी विकास सोसायट्यांचा मोठा गठ्ठा आहे. त्यांचे धाकटे बंधू इंदापूर पंचायत समितीचे सदस्य आहेत. त्यांनीही अजित पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला आहे. जगदाळे यांना मानणारा मोठा वर्ग इंदापूर विधानसभा मतदार संघात आहे.  

ट्रेंडिंग बातमी - '...आता पाडापाडी' जरांगे बोलले, कोणाचे धाबे दणाणले?

जगदाळेंमुळे भरणेंचा कसा होणार फायदा ?

आप्पासाहेब जगदाळे हे विधानसभेचे उमेदवार म्हणून दावेदार होते. त्यांनी सुरूवातीला शरद पवारांकडे उमेदवारी मागितली होती. पण ऐन वेळी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमधून शरद पवार गटात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना उमेदवारीही देण्यात आली. त्यामुळे जगदाळे हे नाराज झाले होते. त्यांच्या स्वत:च्या सहकारी संस्था आहेत. त्यामाध्यातून त्यांनी कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण केले आहे. त्याचा थेट फायदा भरणे यांना होणार आहे. शिवाय हर्षवर्धन यांच्या प्रत्येक निवडणुकीत आप्पासाहेब जगदाळे यांनी पुढाकार घेतला होता. त्यामुळे पाटील यांची रणनिती काय असणार आहे याची कल्पनाही त्यांना असेल. त्याचाही फायदा भरणे यांना होणार आहे. जगदाळे यांनी पक्ष सोडू नये यासाठी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी अखेर पक्ष सोडला. 

ट्रेंडिंग बातमी - लाल संविधान दाखवून कुणाला इशारा देताय? देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींना प्रश्न

हर्षवर्धन पाटील यांचे टेन्शन वाढले? 

जगदाळे यांच्या या निर्णयामुळे हर्षवर्धन पाटील यांच्या पुढील अडचणी वाढण्याच्या दाट शक्यता आहे. जगदाळे हे आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात गेले आहेत. जगदाळे हे ढाण्या वाघ आहेत असे कौतूक अजित पवारांनीच केले होते. त्यामुळे अजित पवार गटात सध्या उत्साहाचे वातावरण आहे. तर याची भरपाई कशी करायची याची रणनिती आता हर्षवर्धन पाटील आखत आहेत. मात्र या मतदार संघात आता चुरशीची लढत होणार हे मात्र नक्की आहे. यात बाजी कोण मारणार याची उत्सुकता संपूर्ण मतदार संघात आहेत. शरद पवार आणि अजित पवारांची प्रतिष्ठा या निमित्ताने पणाला लागली आहे.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com