
मनोज सातवी
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पालघरमध्ये उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवार असलेल्या भारती कामडी यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतच प्रवेश केला आहे. ठाकरेंची साथ का सोडावी लागली हे सांगताना त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहे. शिवाय उद्धव ठाकरेंच्या जवळच्या नेत्यावरही गंभीर आरोप केले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी केलेल्या आरोपामुळे ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान या माध्यमातून शिंदेंनी ठाकरेंना एक प्रकारे धक्का दिल्याचे बोलले जात आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मधून शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार असलेल्या भारती कामडी यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे पालघरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विधानसभेसाठी माझ्या नावाची चर्चा होती. असं असताना मला एकदाही विचारलं नाही. मला विश्वासात घेतलं जात नव्हतं. म्हणून आपण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे भारती कामडी यांनी म्हटलं आहे. या शिवाय त्यांनी अनेक गंभीर आरोप केला आहेत. शिवाय ठाकरे गटात असताना आपल्याला कशा पद्धतीने डावललं गेलं याचा पाढा त्यांनी वाचला आहे.
ट्रेंडिंग बातमी - कुटुंब एक पण पक्ष अनेक! राजकारणात दबदबा असलेले 'हे' कुटुंब माहीत आहे का?
लोकसभा निवडणूक लढण्यास आपण इच्छुक नव्हतो. पालघर विधानसभेची निवडणूक लढण्याची आपली इच्छा होती असे कामडी यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक लढण्या इतकी माझी आर्थिक स्थिती सक्षम नव्हती. त्याचवेळी मला समजलं होतं, की जयेंद्र दुबला हे पालघरसाठी इच्छुक होते. त्यामुळे विधानसभेसाठी आपला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून, मला लोकसभा लढवायला लावण्याचे षडयंत्र रचले गेले असा गंभीर आरोप कामडी यांनी केला आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'मविआचं सरकार आलं तर उद्धव ठाकरे...' फडणवीस थेट बोलले
पालघर विधानसभेसाठी इच्छुक असताना ही कोणी ही त्याबाबत विचारलं नाही. मात्र दुसऱ्या पक्षातून आलेला इच्छुक उमेदवार काशिनाथ चौधरी यांना मातोश्रीवर बोलवून त्यांची समजूत काढण्यात आली. मला मात्र मातोश्रीवर बोलवलं नाही. विनायक राऊत यांनी जाणून बुजून हे सर्व केलं असा आरोपही त्यांनी केला. पालघर विधानसभेसाठी माझ्या नावाची चर्चा असताना मला तिकीट न देण्यासाठी विनायक राऊतानी सर्वतोपरी प्रयत्न केले. असं कामडी आपल्या आरोपात म्हणतात.
ट्रेंडिंग बातमी - ठाकरे गटाचा वचनमाना जाहीर; उद्धव ठाकरेंनी काय दिलीत आश्वासने?
श्रीनिवास वनगांप्रमाणे लोकसभेतील पराभवानंतर पालघर विधानसभेसाठी संधी मिळेल असे वाटलं होतं. ज्याप्रमाणे श्रीनिवास वनगा यांना लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर पालघर विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट दिलं. तसे मलाही वाटले होते की लोकसभेत जर कदाचित पराभव झाला तर मला पालघर विधानसभा मतदारसंघातून संधी मिळेल. परंतू नंतर पाहू असे सांगून मला विनायक राऊत यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं असाही आरोप कामडी यांनी केला आहे. एक महिला असूनही लोकसभेला लढले. पण विधानसभेला विश्वासात घेतलं नाही असंही त्या म्हणाल्या.
ट्रेंडिंग बातमी - शिंदे आणि राज यांच्यात काय बिनसलं? मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच तोंड उघडलं
शिवसेना ठाकरे गटाने जयेंद्र दुबला यांना पालघर विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे. उमेदवाराची घोषणा झाल्यानंतर त्यांच्या नावाला आपण विरोध केला होता. तसा मेसेज पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना केला होता. दुसरा कोणताही उमेदवार द्या अशी मागणी केली होती. जयेंद्र दुबला यांनी लोकसभा निवडणुकीत माझं काम केलं नाही. लोकसभेत त्यांच्या जिल्हा परिषद गटात साडेसहा हजार मतांनी मी मागे पडले होते ही बाबही पक्ष प्रमुखांच्या निदर्शनास आणून दिली. पण त्याची कोणतीही दखल घेतली नाही. बोईसर विधानसभेचे जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांना पालघर विधानसभेची जबाबदारी दिली. त्यांच्या विरोधातही नाराजी होती असे कामडी म्हणाल्या. अशा वेळी आपली पक्षाला गरज नाही असे वाटले. त्यामुळे ठाकरेंची साथ सोडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world