गेल्या आठवड्याभरापासून राज्यभरात तुफान पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. कोल्हापुरात सध्या पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह ठाण्यातही तुफान पाऊस सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रेल्वे प्रशासनाला मोठा फटका बसला आहे. नंदुरबार-सुरत वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांच्या शाळांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
अतिवृष्टीमुळे नवापूर तालुक्यात रेल्वे मातीचे ढिगारे हटवल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत
नंदुरबार जिल्ह्यात रात्रीपासून अतिवृष्टी झाली होती. त्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसलेला पाहण्यास मिळाला नवापूर तालुक्यातील चिचपाडा रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे मार्गावर मातीचे ढिगारे आल्याने रेल्वे मार्ग ठप्प झाला होता. तर दुसरीकडे कोडदा रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने गेल्या आठ तासापासून सुरत भुसावळ रेल्वे वाहतूक ठप्प होती. रेल्वे प्रशासनाच्या वतीने तातडीच्या उपाययोजना करत रेल्वे मार्गावरील मातीचे मलबे हटवल्यानंतर रेल्वे वाहतूक सुरळीत झाली आहे. नंदूरबारसह इतर रेल्वे स्थानकांवर थांबुन असलेल्या एक्सप्रेस गाड्या आठ तासानंतर मार्गस्थ झाल्या आहेत.
खेडमधील जगबुडी नदीला आलेल्या पुराचं पाणी ओसरलं, सर्वत्र चिखलाचं साम्राज्य
खेडमधील जगबुडी नदीला आलेल्या पुरामुळे काल बाजारपेठेत पुराचं पाणी शिरलं होतं, हे पाणी ओसरल्यानंतर आता रस्त्यांवर चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. नगरपरिषद प्रशासनाकडून बाजारपेठेतील चिखल स्वच्छ करण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. टँकरच्या माध्यमातून खेड बाजारपेठेतील चिखलमय रस्ते स्वच्छ करण्यात येत आहेत. चिखलामुळे खेडमधील बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दुर्गंधी देखील पसरली आहे. जगबुडीला आलेल्या पुरामुळे खेडमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनला आहे. त्यामुळे पाणी उकळून पिण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
खेड तालुक्यात चास कमान धरणातून 6030 क्यूसेक विसर्ग सुरू
पुण्याच्या खेड तालुक्यात चास कमान धरणातून 6030 क्यूसेक विसर्ग सुरू झाला आहे. भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सुरु असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
नवापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचं मोठं नुकसान
नवापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शहरातील इस्लामपुरा परिसरात जवळपास 300 घरं असून या घरांमध्ये सहा ते सात फूटापर्यंत पाणी शिरलं होतं. परिसरात एवढा मोठा प्रमाणात आलेल्या पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच नागरिकांच्या संसार उपयोगी वस्तू पूर्णतः खराब झाल्या आहेत. प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. नागरिकांकडे फक्त अंगावर असलेले कपडे शिल्लक राहिले असल्याची माहिती स्थानिक महिलांनी दिली आहे.
नकाने तलावात 4 टक्के जलसाठा
धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या नकाने तलावात पाणीसाठा निर्माण झाला असून यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. आणि उन्हाळ्यात नकाने त्याला कोरडा झाला होता. मात्र गेल्या महिन्याभरापासून होत असलेल्या पावसामुळे नकाने तलावात 4 टक्के जलसाठा निर्माण झाला आहे. मात्र अद्याप देखील धुळे जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. नकाने तलावात निर्माण झालेल्या जलसाठ्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त आहे.