Threat to Virat Kohli's security: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बुधवारी (22 मे) राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RR vs RCB) यांच्याच एलिमेनेटरचा सामना होईल. यामधील विजयी टीमचा सामना दुसऱ्या क्वालिफायरमध्ये सनरायझर्स हैदराबादशी होणार आहे. तर पराभूत टीमचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. दोन्ही संघासाठी हा अतिशय महत्त्वाचा सामना आहे. या सामन्यापूर्वी विराट कोहलीच्या सुरक्षेबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'आनंदबाजार पत्रिकने' गुजरात पोलिसांच्या हवाल्यानं विराट कोहलीच्या सुरक्षेला धोका असल्याचा दावा केलाय. गुजरात पोलिसांनी सोमवारी रात्री चार जणांना दहशतवादी कारवायांच्या संशयावरुन अटक केलीय. पोलिसांनी या संशयित आरोपींकडून हत्यारं, संदिग्ध व्हिडिओ आणि टेक्स्ट मेसेज मिळाले आहेत अशी माहिती आहे.
या रिपोर्टनुसार, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं सुरक्षेच्या कारणांमुळे एलिमेनेटर सामन्यापूर्वीचं एकमेव सराव सत्र रद्द केलंय. आरसीबीची टीम मंगळवारी अहमदाबादमधील गुजरात कॉलेजच्या मैदानावर सराव करणार होती. पण, टीमनं कोणतंही अधिकृत कारण न देता हे सत्र रद्द करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्सनं त्यांचा नियोजित सराव केला. एलिमेनेटर मॅचच्या आदल्या दिवशी कोणतीही पत्रकार परिषद झाली नाही. सामान्यपणे मॅचच्या आदल्या दिवशी संध्याकाळी पत्रकार परिषद होते.
( नक्की वाचा : सुपर फ्लॉप ते ब्लॉकब्लास्टर! RCB च्या सलग 6 विजयाचं रहस्य काय? )
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मंगळवारी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात क्वालिफायर 1 चा सामना होता. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि आरसीबीला सरावासाठी गुजरात कॉलेजचे मैदान देण्यात आले होते.
राजस्थान आणि आरसीबीचे खेळाडू सोमवारीच अहमदाबादमध्ये दाखल झाले होते. रविवार आणि सोमवारी त्यांची पुरेशी विश्रांती झाली होती. त्यामुळे आरसीबीनं सराव सत्र रद्द करण्याचं कारण काय? याची चर्चा आता सुरु झालीय. या रिपोर्टनुसार पोलीस अधिकारी विजय सिंघा ज्वाला यांनी सांगितलं की, 'विराट कोहलीला अहमदाबादमध्ये दाखल झाल्यानंतर चार जणांच्या अटकेबाबत समजलं. तो एक राष्ट्रीय संपत्ती आहे. त्याची सुरक्षा आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. आरसीबीला कोणताही धोका घ्यायचा नव्हता. त्यांनी सराव सत्र होणार नसल्याचं कळवलं. राजस्थान रॉयल्सला देखील याबाबत कळवण्यात आलं होतं. त्यांना त्यांचं सराव सत्र घेण्यात कोणती अडचण नव्हती.
( नक्की वाचा : विराट कोहलीच्या RCB ला अद्याप एकदाही आयपीएल चॅम्पियन का होता आले नाही? )
या घटनेनंतर आरसीबीच्या टीम हॉटेलबाबहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. आरसीबीच्या सर्व सदस्यांसाठी हॉटेलमध्ये वेगळी एन्ट्री करण्यात आली आहे. या मार्गावरुन हॉटेलमधील सर्व पाहुणे तसंच आयपीएलनं मान्यता दिलेल्या मीडियातील कर्मचाऱ्यांनाही प्रवेश करण्यास परवानगी नव्हती.
या रिपोर्टनुसार राजस्थान रॉयल्सची टीम 'ग्रीन कॉरिडोरचा' वापर करुन मैदानात दाखल झाली. पोलिसांच्या तीन पथकांनी त्यांना एस्कॉर्ट केलं. कॅप्टन संजू सॅमसन उशीरा पोहोचला. आर. अश्विन, रियान पराग आणि यजुव्ंदज्र चहल यांनी सराव सत्राला न जाता हॉटेलमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. राजस्थानच्या खेळाडूंनी कडेकोट सुरक्षेमध्ये सराव केला. सरावाच्या दरम्यान संपूर्ण मैदानात पोलीस टेहाळणी करत होते. सुरक्षेच्या कारणामुळेच दोन्ही टीम व्यवस्थापनाला मॅच पूर्वी होणारी प्रेस कॉन्फरन्स रद्द करावी लागली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world