कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कब्रस्तानांच्या प्रश्नावर महत्त्वाची बैठक पार पडली. मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या चर्चेत KDMC आयुक्तांनी कल्याण-डोंबिवली परिसरात तीन ठिकाणी कब्रस्तानासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. मोहने येथील एका महिलेच्या दफनविधीवरून निर्माण झालेल्या वादानंतर हा प्रश्न अधिकच चर्चेत आला होता. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कब्रस्तानांच्या अपुऱ्या सुविधांबाबत मुस्लिम समाजाकडून सातत्याने मागणी करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि KDMC प्रशासन यांच्यात बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत आयुक्तांनी कल्याण पूर्व येथील कचोरे, कल्याणजवळील टिटवाळा आणि मांडा येथे कब्रस्तानासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.