राज्यात जवळपास सर्वच शहरांमध्ये तापमानाचा पारा चढलेला बघायला मिळतोय. अमरावती हे काल देशातील सर्वाधिक तर जगभरातील १५ व्या क्रमांकाचे उष्ण शहर ठरले. यातील अमरावती आणि अकोला या दोन्ही शहरांमध्ये सरासरीपेक्षा अनुक्रमे ६.८ आणि ५.३ अंशांनी अधिक तापमान नोंदविले गेले असल्याने येथे उष्णतेची लाट असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. मार्च महिन्यातच अशी अवस्था असेल तर एप्रिल आणि मे महिन्यात किती ऊन पडेल? असा प्रश्न सर्वसामान्यांना सतावत आहे. या दरम्यान हवामान विभागाने आगामी काळात विदर्भात वादळी पावसाचा देखील अंदाज वर्तवला आहे.मुंबईसह उत्तर कोकणवासीयांना सध्या तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. या दरम्यान कमाल तापमानात लक्षणीय वाढ नोंदवली जात असतानाच, मुंबईसह पालघर, ठाणे आणि रायगड आदी भागांना आज आणि शनिवारी पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलाय.