अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीतील गोंधळ आणखी वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अपक्ष आमदार किरण सरनाईक यांनी आज शिंदे शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल करत आपणच महायुतीचे अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केला. मात्र त्यांच्या अर्ज दाखल कार्यक्रमाकडे महायुतीतील अनेक प्रमुख खासदार आणि आमदारांनी पाठ फिरवल्याचं दिसून आलं. यावेळी केवळ मंत्री संजय राठोड उपस्थित होते. त्यातच शिंदे सेनेकडून सरनाईक यांच्या उमेदवारीची अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.