रात्रीपासून काहीशी उसंत घेतलेल्या पावसाने दुपारनंतर पुन्हा जोरदार हजेरी लावत भिवंडी शहर आणि ग्रामीण भागाला अक्षरशः झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे शहरातील सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून बाजारपेठ, तीन बत्ती आणि भाजी मार्केट परिसरात दोन ते तीन फूट पाणी साचले आहे. त्यामुळे अनेक दुकानांमध्ये पाणी शिरून व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक दुकानदार आपला दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलवून दुकानें बंद करून घरी निघून गेले असून हॉटेल व्यावसायिकांनाही हॉटेलमध्येच थांबण्याची वेळ आली आहे. पावसामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, साचलेल्या पाण्याचा तातडीने निचरा करण्यासाठी प्रशासनाकडून प्रभावी उपाययोजना होत नसल्याचा आरोप केला जात असून नागरिकांनी त्वरित उपाययोजनांची मागणी केली आहे.