सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात पुन्हा एकदा चिंताजनक प्रकार समोर आला आहे. उमदी-पंढरपूर महामार्गालगत धुंडाप्पा माळी यांच्या शेतातील विहिरीतून मोठ्या प्रमाणात पेट्रोलसदृश्य पदार्थ बाहेर येत असल्याचा दावा करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी विहिरीतील पाण्यासोबत वाहणारा हा पदार्थ भरून काढल्याचा दावा केला असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे या विहिरीपासून काही अंतरावर पेट्रोल पंप असून, गळतीचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र यापूर्वीच्या तपासणीत गळती नसल्याचे सांगण्यात आले होते. आता पुन्हा हा प्रकार सुरू झाल्याने प्रशासनाने तातडीने शास्त्रीय तपासणी करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.