महाराष्ट्र राज्यासह देशभरात डिजिटल अरेस्टद्वारे नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा रायगड पोलिस दलाच्या सायबर सेलने पर्दाफाश केला. या कारवाईत आतापर्यंत ११ जणांना अटक केली आहे. यातील मुख्य आरोपी पाच 'सर्व्हर' चालवत होता. गेल्या २८ दिवसांत एका सर्व्हरवरून ६२ लाख ९२ हजार ७८ कॉल करण्यात आले होते. त्यापैकी महाराष्ट्रातील ८६ हजार ९१० जणांची फसवणूक झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले. अलिबागमधील एका व्यक्तीला भामट्यांनी फोन करून 'टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडिया'कडून बोलत असल्याचे सांगून त्याला ९ क्रमांक डायल करायला सांगितला. त्यानंतर भामट्यांनी तुमचा कॉल मुंबई सायबर पोलिसांकडे फॉरवर्ड करून तुम्ही 'मनी लॉड्रिंग' केले आहे, अशी भीती दाखवत त्याला डिजिटल अरेस्ट केली. भामट्यांनी त्याच्याकडून ६६ लाख रुपये उकलले. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने २३ मे रोजी रायगड सायबर पोलिसांकडे तक्रार केली.