Ratnagiri| संगमेश्वरच्या दाभोळे गावात आढळलं बिबट्याचं दुर्मिळ पांढरे पिल्लू | NDTV मराठी

रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे गावात बिबट्याचे दुर्मीळ पांढरे पिल्लू आढळून आलं आहे. या पिल्लाची आईसोबत पुनर्भेट झाली असून त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले आहेत. दरम्यान हे पिल्लू 'ल्युकिस्टिक' आहे की 'अल्बिनो' याचा अद्याप उलगडा झालेला नाही. कारण, या पिल्लाचे डोळे अजूनही उघडलेले नाही मात्र, महाराष्ट्रात प्रथमच बिबट्याचे पांढऱ्या रंगाचे पिल्लू आढळून आले आहे. संगमेश्वर तालुक्यातील दाभोळे गावात बुधवारी काजू लागवडीसाठी झाडे तोडण्याचे काम सुरू होते. सकाळी झाडे तोडण्याच्या कामाला सुरुवात केल्यानंतर मजुरांना बिबट्याची दोन पिल्लं आढळून आली. त्यातील एक पिल्लू नियमित रंगाचे तर दुसरे पिल्लू पूर्णपणे पांढऱ्या रंगाचे होते. या पिल्लांचे डोळे देखील उघडलेले नव्हते. मजुरांनी लागलीच या पिल्लांची छायाचित्र टिपली. मात्र, शेजारीच असणाऱ्या मादीने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यामुळे घाबरलेली मंडळी तिथून दूर झाली. त्यांनी यासंबंधीची माहिती रत्नागिरी वन विभागाला उशिराने कळवली. वन विभागाची टीम घटनास्थळी दाखल होईपर्यंत मादीने पिल्लांना दुसऱ्या ठिकाणी हलवलं होते.

संबंधित व्हिडीओ