राजस्थानमध्ये सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय पुष्कर मेळाव्यात यंदा तब्बल ९ हजार ९३२ जनावरे दाखल झाली आहेत. अलीकडच्या वर्षांतील ही सर्वाधिक नोंद ठरली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या माहितीनुसार, यंदाच्या मेळ्यात जनावरांच्या सहभागाचा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. पारंपरिक कार्यक्रमांसोबतच यावर्षी अनेक नव्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. उत्तम पशूवंश संवर्धनाला चालना देणं आणि पशुपालकांना प्रोत्साहन देणं हा त्यामागील उद्देश आहे. १७ नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा आठवडाभराचा पुष्कर मेळा २४ नोव्हेंबरला संपणार आहे. मेळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि पारंपरिक स्पर्धा आयोजित केल्या जातात. हे आकर्षण पाहण्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. तसेच स्थानिक नागरिकांचाही या मेळ्यात उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळतो.