पुण्यामध्ये विषारी दारू प्यायल्याने 24 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांनी छापेमारी करीत कारवाई केली.अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे पोलिसांनी गावठी दारू निर्मितीच्या अड्ड्यावर धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केलाय.गोरखेडा परिसरातील शेतातील बेड्यावर सुरू असलेल्या अवैध दारू निर्मिती केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईदरम्यान तब्बल ८४ हजार लिटर मोहाचा सडवा जप्त करून नष्ट करण्यात आला.याशिवाय दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे नवसागर, गूळ, लोखंडी पिंपे, टोपल्या, कढई, पाईप आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले. या संपूर्ण कारवाईत सुमारे ९ लाख ८८ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी गोरखेडा येथील गिरीश सुभाष पवार याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.