विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली.आर्णी तालुक्यातील बोरगाव, दाभडी आणि परिसरातील अनेक गावांना या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका बसला आहे.दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास गडगडाट, वादळी वारे आणि गारपिटीसह जोरदार पाऊस झाला… जवळपास अर्धा तास सुरू असलेल्या या वादळामुळे अनेक घरांचे पत्रे उडून गेले, तर काही घरांचे नुकसान झाले आहे.या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात साठवून ठेवलेले तीळ, गहू, ज्वारी, बाजरी आणि कडधान्यांचं मोठं नुकसान झालं… आधीच अवकाळी पावसाचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांवर नव्या संकटाचं सावट निर्माण झालं आहे.अवकाळी पावसामुळे काही प्रमाणात उष्णतेपासून दिलासा मिळाला असला, तरी अनेक गावांमध्ये नुकसानीचं चित्र गंभीर आहे.दरम्यान, नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.