Dharashiv| 100 रुपयांच्या बॉण्डवर दत्तक करार, 10 हजारांना मुलाची विक्री? सामाजिक कार्यकर्ते आक्रमक

धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथे माणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे.एका चिमुकल्याची केवळ दहा हजार रुपयांना विक्री करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय.विशेष म्हणजे ही विक्री शंभर रुपयांच्या बॉण्डवर ‘दत्तक करार’ दाखवून करण्यात आली. चिमुकल्याची स्वतःची आई आणि मामी या दोघींनी मिळून हा सौदा केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोलापूरच्या एका दांपत्याला मुलगा दिला गेला आणि त्याचं भविष्यच बदलून टाकण्यात आलं. या प्रकारावर मुलाच्या आजीनं गंभीर आरोप करत पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तिच्या मते, सुनेनं दुसरं लग्न करण्यासाठी पहिल्या पतीपासून झालेलं मूल विकलं. ही सून आणि नातवंड अचानक गायब झाल्यानंतर मुरूम पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रारही दाखल करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्त्यांनी मुलाला शोधून काढलं आणि बालकल्याण समितीसमोर हजर केलं. मुलगा ताप, जुलाब आणि गालफुगीसह अत्यंत हालाखीच्या अवस्थेत आढळून आला. बालकल्याण समितीनं ही दत्तक प्रक्रिया बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट केलं आहे. गुन्हा दाखल करण्याच्या सूचनाही पोलिसांना देण्यात आल्या आहेत. सध्या चिमुकल्यावर धाराशिवच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयाबाहेर सामाजिक कार्यकर्ते आणि दत्तक घेणाऱ्या महिलेमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली.

संबंधित व्हिडीओ