शहर आणि उपनगरांमध्ये आज उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. येत्या २४ तासांत शहरातील तापमानात वाढ होऊन कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास राहू शकते. यासोबतच आर्द्रतेची पातळीही वाढलेली राहणार असल्यामुळे उष्णतेची तीव्रता अधिक जाणवणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांना असह्य उकाडा सहन करावा लागत आहे. तापमानाचा पारा कमी असला तरी वाढत्या आर्द्रतेने नकोसे केले आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत मंगळवारी दिवसभरात सूर्यप्रकाश तीव्र असणार असून, आकाश काही प्रमाणात ढगाळ राहील. दुपारी आणि सायंकाळी उकाडा अधिक जाणवेल. आर्द्रतेची पातळी ७० टक्क्यांपेक्षा अधिक राहण्याची शक्यता असून, त्यामुळे प्रत्यक्षात तापमान कमी असले तरी ते अधिक असल्याची जाणीव होईल.