जळगाव जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झालेली असतानाच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या स्वागतासाठी शेतकऱ्यांनी अनोखी पद्धत अवलंबली. जळगाव विमानतळावर जिल्ह्याची ओळख असलेली भरीताची वांगी भेट देत शेतकऱ्यांनी कृषिमंत्र्यांचे स्वागत केले. मात्र या स्वागतामागे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या व्यथा आणि अपेक्षाही दडलेल्या होत्या. गेल्या ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत फक्त आढावा बैठका आणि दौरे घेऊन उपयोग नाही, तर शेतकऱ्यांना तातडीने आणि भरीव आर्थिक मदत मिळणे गरजेचे आहे, अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. दुष्काळातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी ठोस कारवाई करावी, अन्यथा अशा भेटी आणि दौऱ्यांचा काहीच उपयोग होणार नाही, अशा शब्दांत शेतकऱ्यांनी आपल्या अपेक्षा मांडल्या.