राज्यात उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अनेक भागांत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. मुंबईत तुलनेने तापमान जरी कमी असले तरी सोमवारपासून तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढचे दोन ते तीन दिवस मुंबईकरांना उकाड्याबरोबरच उन्हाचा तडाखाही सहन करावा लागणार आहे... मुंबईत सध्या कमाल तापमान ३२ ते ३३ अंशादरम्यान आहे. मात्र वाढती आर्द्रता आणि दमट हवामान यांमुळे उष्मा अधिक जाणवत आहे. दिवसभराचे तापमान कमी असल्यामुळे मागील काही दिवसांपासून उन्हाच्या तडाख्यापासून मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मात्र, आता पुन्हा उन्हाचा चटका सहन करावा लागणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारपासून साधारण बुधवारपर्यंत मुंबईच्या तापमानाचा पारा चढा राहणार आहे. त्यामुळे उकाडा आणि उन्हाचा ताप नागरिकांना सहन करावा लागणार आहे. या दिवसांत तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट अनुभवायला मिळत आहे.